Share

ओंजळ : पल्लवी अष्टेकर

समाजातील कष्टकरी लोकांना आदराने वागविणे ही प्रथा आपल्याकडे अजून तितकीशी रुळलेली नाही. जसे आपण आपल्या आत्मसन्मानासाठी झटत असतो, तसेच इतरांनाही आत्मसन्मानाने जगू देणे हे आपले कर्तव्य नाही का?

आपल्या समाजात अशी कितीतरी लोकं आहेत की, ज्यांची पोटं हातावर चालतात. दररोजच्या कमाईवर त्यांचे जीवन अवलंबून असते. यात कष्टकरी स्त्रीया, बांधकामावरचे मजूर, वाॅचमन, सिक्युरिटीचे लोक, शिपाई वर्ग, बालकामगार, कचरावेचक स्त्रीया यांचा समावेश होतो. रस्त्यावरून चालताना तीनचाकी सायकलीच्या आजूबाजूला सिलिंडर लावून चालणाऱ्या व्यक्ती आपण पाहात असतो.

मध्यंतरी एकदा भाज्या-फळे आणण्यासाठी मी भाजी मंडईत गेले होते, तिथे एक बाई बटाटे खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. त्या बटाटे वेचून लांबवरच्या बुट्टीत फेकत होत्या. त्यामुळे चार-पाच बटाटे रस्त्यावर घरंगळत गेले. ना त्या बाईंनी ते बटाटे उचलून ठेवले, ना ही याबद्दल त्यांना काही खेद-खंत वाटली. आपल्या बटाट्याचे पैसे देऊन त्या निघून गेल्या.

आपण आपल्या आजूबाजूला असे प्रसंग नेहमी बघत असतो. समाजातील कष्टकरी लोकांना आदराने वागविणे ही प्रथा आपल्याकडे अजून तितकीशी रुळलेली नाही. परदेशांत मात्र माळी, साफसफाई कामगार यांना आदराने वागवण्याची पद्धत आहे. “हॅलो, हाय” असे म्हणून लोक त्यांच्या नावाची विचारपूस करतात. येता-जाता ही मंडळी भेटली की, त्यांना शेकहँड करतात. श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव तिथे कमी आहे. सर्व प्रकारच्या कामातील लोकांना समान पद्धतीने वागविण्याची त्यांची रीत आपल्या मनाला लुभावून जाते.

मुंबईत अनेक सिग्नलपाशी मुले पेन्स, कार्टूनची पुस्तके, गजरे विकत असताना आपल्याला दिसतात. फारच कमी लोक या मुलांकडे सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून पाहतात. या मुलांना दिवसभर पायपीट करून, आपला माल खपविण्यासाठी लोकांच्या सतत मागे रहावे लागते; परंतु लोकांना हा माल नको असल्यास, लोक त्यांना झिडकारतात. “अरे, बाजू हठो, हमें मत सताओ”, असे म्हणून त्यांना दूर लोटतात. टिश्यू पेपर्स, गार्बेज बॅग्ज विकणाऱ्या मुलांना देखील लोक शुक-शुक करून हाकलतात. कधी कधी बाजूला ढकलतातही. आपल्याला इतर लोकं अपमानास्पद वागणूक देतात, हे लक्षात येऊनही पोट भरण्यासाठी मुलांना याकडे दुर्लक्ष करावे लागते. काही सिग्नलच्या कोपऱ्यावर तृतीयपंथीय लोक थोड्याशा पैशांच्या आशेने उभे असतात. काही लोक त्यांना पाच-दहा रुपये देतातही; परंतु अनेक लोक त्यांना हुसकावतात. त्यांच्या वाट्याला उपेक्षा येते. मी देखील अधे-मधे त्यांच्या हातावर पाच-दहा रुपये ठेवते; परंतु कधी मी त्यांना पैसे दिले नाहीत, नमस्कार केला, तर ते नमस्कार करून पुढे जातात. तुम्ही जर त्यांच्याशी माणुसकीने वागलात, तर ते तुमच्यासोबत व्यवस्थित वागतात.

एकदा आमच्या सोसायटीत एक दहा-अकरा वर्षांची मुलगी दररोज संध्याकाळी भाजी विकण्यास येऊ लागली. तिच्या डोक्यावर ही भली-मोठी बुट्टी असायची. त्या बुट्टीत केवळ भरपूर पालेभाज्या असायच्या. तिच्यापाशी चौकशी केल्यावर समजले की, ती सकाळची शाळा करून संध्याकाळी भाजी विकते. एवढीशी मुलगी डोक्यावर इतके जड ओझे घेऊन फिरते म्हणून मी तिच्याकडून पालेभाज्या विकत घेत असे. ती म्हणाली, “ताई, मी अनेक घरांचे दरवाजे ठोठावत असते; परंतु माझ्यासाठी घराचे दार उघडण्याचीही कुणी तसदी घेत नाही.” मला या गोष्टीचे वाईट वाटत असे.

नंदा मावशी आमच्या परिचयातील एक साफसफाई कामगार. एकदा रस्त्यावर भेटल्यावर त्या मला सांगू लागल्या, “अवो, इतकी वरसं झाली, मी सोसायट्यांमध्ये कचरा कामगार म्हणून काम करते. माझ्या कामात एकही चूक झालेली लोकांना खपत नाही; परंतु हेच लोक कधी वरच्या मजल्यावरून कचरा फेकतात. पण आम्ही कामगार लोकांनी तोंडातून चकार काढायचा नाही.”

शंकर मामा दररोज कारखान्यामध्ये पोळी-भाजीचे डबे आपल्या सायकलला लावून पोहोचवण्याचे काम करतात. एकदा मुद्दाम वेळ काढून त्यांच्यासोबत गप्पा केल्या. शंकर मामा सांगत होते, “सुरुवातीला जम बसेपर्यंत मला या व्यवसायाचा खूप त्रास झाला. कारखान्यात पोळी भाजीचे डबे पोहोचवताना खूप प्रश्न विचारले जायचे. संशयी नजरा बोचायच्या. कधी कधी डबे पोहोचवायला जरा उशीर झाला की लोक ओरडायचे. मग मीच शहाणा झालो. मोजके बोलणे, वेळेवर आपले काम उरकणे यात तरबेज झालो.”

लग्नसमारंभातही आपण असे प्रसंग अनेकदा बघतो. लग्नातील वाढपींना, ‘ओ शुक शुक’ म्हणून बोलावले जाते. हाॅटेलात काम करणाऱ्या वेटर लोकांची परिस्थिती सुद्धा वेगळी नसते. लोकांची, हाॅटेल मालकांची बोलणी खात त्यांचे आयुष्य पुढे सरकत असते. लोकांनी टेबलवर पाणी सांडले, तर ते तत्परतेने पुसून घेतात. खांद्यावर फडके टाकून, लोकांच्या ऑर्डरी पुरवण्यात ते व्यस्त असतात; परंतु त्यांच्या या अखंड धावपळीत कोणी त्यांच्याशी प्रेमाचे दोन गोड शब्दही बोलत नाही.

खरोखरच सुज्ञ समाजाने याबद्दल विचार करणे आवश्यक आहे. जसे आपण आपल्या आयुष्यात आत्मसन्मानासाठी झटत असतो, तसेच इतरांना देखील आत्मसन्मानाने जगू देणे हे आपले कर्तव्य नाही का? निव्वळ माणुसकीच्या नात्याने जरी आपण त्यांच्याशी वागत राहिलो तरी त्यांना खूप आधार वाटतो, प्रोत्साहन मिळते, जीवनात उमेद वाटते. त्यामुळे “ओ शुक शुक”पेक्षा आपण या सर्वांसोबत आपुलकीचे नाते प्रस्थापित करूया.

Recent Posts

Cow slaughter case : रायगड जिल्ह्यातील महाड येथील गोहत्येचा मुद्दा अधिवेशनात गाजणार!

DYSP शंकर काळे यांच्या निलंबनाची शक्यता? रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र भूमी म्हणून रायगड…

31 mins ago

Jalna News : अ‍ॅक्शन मोड! बेकायदा अवैध सोनोग्राफी सेंटरवर आरोग्य पथकाची धाड

कपाट भरून गर्भपाताची औषधे, लाखोंची रोकड पाहून अधिकाऱ्यांच्या उंचावल्या भुवया जालना : महाराष्ट्रात गर्भवती महिलांची…

32 mins ago

Raj Thackeray : १६ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ खटल्यात राज ठाकरे निर्दोष!

इस्लामपूर न्यायालयाचा मोठा निर्णय सांगली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याबाबत एक मोठी…

55 mins ago

Dharmaveer 2 : ज्याच्या घरातील स्त्री दुःखी त्याची बरबादी नक्की!

मराठीसह हिंदीत 'धर्मवीर २'चा धगधगता टीझर आऊट मुंबई : कट्टर हिंदुत्ववादी आणि शिवसैनिक धर्मवीर आनंद…

2 hours ago

Assam Rain : आसाममध्ये पावसाचा हाहाकार! पुरामुळे ५२ लोकांनी गमावले प्राण

८ वर्षांचा मुलगा बेपत्ता; वडील शोधत असताना मुलाची केवळ चप्पल मिळाली दिसपूर : सध्या देशभरात…

3 hours ago

Raigad Accident : भीषण अपघात! दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक

१५ ते २० प्रवासी जखमी, २ जण गंभीर रायगड : काही दिवसांपूर्वी पोलादपूर (Poladpur) येथे…

3 hours ago