Monday, July 8, 2024

अवकाशयान

कथा : प्रा. देवबा पाटील

दूर अवकाशात परग्रहांचा अभ्यास करण्याकरिता, संशोधन करण्याकरिता वा काही विशिष्ट उद्देशाने पाठविलेल्या वस्तू वा उपकरणाला ‘अवकाशयान’ असे म्हणतात. ग्रहाचा अभ्यास करून पृथ्वीवर परत आणता येते, ते अवकाशयान असते.

संदीप व दीपा हे दोघे भाऊ-बहीण आपल्या शाळेच्या ग्रंथालयात गेले व त्यांनी ग्रंथपाल सरांना अवकाशयानवर एखादे पुस्तक असल्यास देण्याची विनंती केली. ग्रंथपाल सरांनी त्यांना प्रा. देवबा पाटील यांचे “यक्षाचे यान” हे पुस्तक काढून दिले व म्हणाले, “बाळांनो, तुम्हाला काही शंका असल्यास मला विचारू शकता.”

“स्पेस शटल म्हणजे काय असते सर?” संदीपने प्रश्न केला.

“स्पेस शटल म्हणजे एक प्रकारचे अवकाश वाहनच असते. अग्निबाण, इंधन टाकी व अवकाशयान किंवा उपग्रह या तिन्ही मिळून बनणा­ऱ्या अवकाश परिवहन यंत्रणेस स्पेस शटल म्हणतात.” दीपानेच सांगितले.

“पण ही याने अवकाशात सूर्याच्या प्रचंड उष्णतेने जळून खाक का होत नाहीत?” दीपाने प्रश्न केला.

“ही अवकाशयाने वा कृत्रिम उपग्रह अवकाशात गेल्यांनतर नैसर्गिक उपग्रहांसारखेच स्वत:भोवती सतत गिरकी घेत-घेतच एखाद्या ग्रहाकडे जातात व त्या ग्रहाभोवतीही फिरतात. त्यामुळे त्यांच्या सर्व बाजूंवर क्रमाक्रमाने, काळाकाळाने, आळीपाळीने सूर्यप्रकाश सारखाच पडत राहतो. त्यामुळे त्यांच्या सर्व बाजू सारख्याच प्रमाणात तापतात. त्यामुळे ते सूर्याच्या प्रचंड उष्णतेने जळत नाहीत. ते स्वत:भोवती फिरलेच नसते, तर त्यांच्या सूर्याकडील एकाच बाजूवर सतत प्रकाश पडत राहिला असता. सूर्याच्या प्रखर उष्णतेने सूर्याकडील एकच बाजू अतिशय तापल्याने त्याची जळण्याची शक्यतासुद्धा वाढली असती.” ग्रंथपाल सरांनी सांगितले.

“कृत्रिम उपग्रह व अवकाशयान यात काय फरक आहे?” दीपाने विचारले.

ग्रंथपाल सांगू लागले, “अवकाशात एखाद्या ग्रहाभोवती आकाशातच निसर्गत: निर्माण झालेले जे खगोल फिरतात त्यांना नैसर्गिक उपग्रह म्हणतात. पृथ्वीचा चंद्र हा सॅटेलाईट किंवा नैसर्गिक उपग्रह आहे. अवकाशात पृथ्वी, सूर्य, वा इतर ग्रह किंवा त्यांचे उपग्रह यांपैकी कोणत्याही एखाद्या खगोलाभोवती भ्रमण करण्यास पाठविलेले अवकाशयान म्हणजेच मानवनिर्मित कृत्रिम उपग्रह. त्यालाच ऑर्बिटर म्हणतात; परंतु चंद्र, मंगळ, शुक्र इ. ग्रह वा सूर्य यांच्याकडे अथवा दूर अवकाशात परग्रहांचा अभ्यास करण्याकरिता, संशोधन करण्याकरिता वा काही विशिष्ट उद्देशाने पाठविलेल्या वस्तू वा उपकरणाला ‘अवकाशयान’ असे म्हणतात. अवकाशयान म्हणजे अवकाशात जाण्यासाठी वापरण्यात येणारे विशिष्ट प्रकारचे वाहन. थोडक्यात म्हणजे एखाद्या ग्रहावर वा उपग्रहावर उतरवून त्या ग्रहाचा वा उपग्रहाचा अभ्यास करून पृथ्वीवर परत आणता येते ते अवकाशयान असते, तर त्या ग्रहाचा वा उपग्रहाचा सदोदित अभ्यास करण्यासाठी त्याभोवती जे सतत फिरत राहते ते अवकाशयान म्हणजे कृत्रिम उपग्रह असतो.

आपल्या पृथ्वीभोवती पहिला कोणता उपग्रह फिरला हे माहीत आहे का तुम्हाला?”

“रशियाच्या स्पुटनिक या उपग्रहाने ४ ऑक्टोबर १९५७ रोजी अवकाशातून पृथ्वीभोवती पहिली प्रदक्षिणा घातली व मानवाचे कृत्रिम उपग्रहाचे स्वप्न साकार झाले.” दीपाने उत्तर दिले. “आपल्या भारतानेही आमचा पहिला कृत्रिम उपग्रह आकाशात सोडला. काय त्याचे नाव गं ताई? हां आठवलं आर्यभट्ट.” संदीप बोलला.

“पण केव्हा सोडला होता? कोठून सोडला होता?” सरांनी मुद्दामहून त्यांचे ज्ञान तपासण्यासाठी प्रश्न केले.

दीपा उत्तरली, “भारताचा “आर्यभट्ट” हा पहिला उपग्रह भारताने १९ एप्रिल १९७५ला सोविएत अग्निबाणाच्या साहाय्याने त्यांच्या बैकानूर या अंतराळयान तळावरून अवकाशात पाठवला नि आमच्या भारताचे नाव जागतिक अवकाश संशोधन क्षेत्रात दिमाखाने नोंदवले गेले.” “दीपा बेटा, तुला तर बरीच माहिती आहे.” सर म्हणाले, “आता मला सांग बरं आपल्या सूर्यमालेतील कोणकोणत्या ग्रहांवर मानवाची अवकाशयाने गेली आहेत?” सरांनी प्रश्न केला. “आपल्या सूर्यमालेतील बुध, शुक्र, मंगळ, गुरू, शनी या ग्रहांकडे मानवाची अवकाश निरीक्षक याने गेली आहेत. मरीनर-१० हे बुधाकडे, व्हेनेरा हे शुक्राकडे, व्हायकिंग मंगळाकडे, तर पायोनियर गुरू व व्हॉयेजर शनीकडे गेले आहेत. या सर्व अवकाश निरीक्षक यानांनी त्या त्या संबंधित ग्रहांचे जवळून फोटो काढून पृथ्वीवर पाठविले आहेत. काही याने युरेनस, नेपच्यूनकडेसुद्धा गेली आहेत पण अजून ते तिकडे पोहोचली नाहीत.” दीपाने उत्तर दिले. “भारताने कोणते कृत्रिम उपग्रह आकाशात सोडले आहेत?” सरांनी पुन्हा विचारले. संदीप पटकन म्हणाला, “भारताने पहिला आर्यभट्ट, नंतर भास्कर, रोहिणी, अॅपल व आजकाल इन्सॅट, जीसॅट उपग्रहांची मालिका इ. अनेक उपग्रह आकाशात सोडले आहेत.”

“छान! हे पुस्तक घरी न्या व लक्षपूर्वक वाचा.” असे म्हणत ग्रंथपालांनी त्यांच्या नावे ते पुस्तक दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -