
कर्जत: कर्जत बाजार समितीच्या सभापती-उपसभापती निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपने जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांचा दारुण पराभव करत भाजपचे आमदार राम शिंदेंनी (BJP MLA Ram Shinde) समिती ताब्यात घेतली आहे. कर्जत बाजार समितीच्या सभापतिपदी शिवसेनेचे काकासाहेब तापकीर, तर उपसभापतिपदी अभय पाटील यांची निवड झाली आहे.
या बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे व पवार गटाचे प्रत्येकी नऊ संचालक निवडून आले होते. दोन्ही गटाचे समसमान संचालक असल्याने सभापती व उपसभापती निवडणूक अटीतटीची होणार होती. आज झालेल्या मतदानात रोहित पवार गटाच्या सभापतीपदाच्या उमेदवाराला आठ मते मिळाली. तर रोहित पवार गटाच्या एका संचालकांचे मत बाद झाले. तर उपसभापतीपदामध्ये शिंदे गटाच्या उमेदवाराला एक जास्त म्हणजे दहा मते मिळाली आहेत. रोहित पवारांचा एक संचालक फुटला आहे. त्यामुळे ही बाजार समिती आमदार राम शिंदेंच्या ताब्यात आली आहे.
जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीतही दोन्ही गटाला समसमान मते मिळाली होती. येथे ईश्वर चिठ्ठीवर राम शिंदे गटाचा उमेदवार सभापती झाला. तर रोहित पवारांचा गटाचा उपसभापती झाला आहे. त्यामुळे दोन्ही बाजार समित्या राम शिंदेंच्या ताब्यात आल्या आहेत. त्यामुळे राम शिंदेंची ताकद वाढली आहे.