Monday, July 15, 2024
Homeमहत्वाची बातमीहिंमत असेल तर 'या' विषयांवर बोलून दाखवा

हिंमत असेल तर ‘या’ विषयांवर बोलून दाखवा

नितेश राणेंचे उबाठा सेनेला आव्हान

मुंबई : नांदेड येथे काल झालेल्या भाजपच्या जाहीर सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला बोल केला. याबाबत काही भूमिकाच नसल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मात्र गप्प राहिले आहेत. इतर वेळी निरर्थक बडबड करणा-या संजय राऊतांनी हिंमत असेल तर आता बोलून दाखवावं, असं आव्हान भाजप आमदार नितेश राणेंनी आजच्या त्यांच्या पत्रकार परिषदेत दिलं.

हिंदुत्वाशी बेईमानी कोणी केली? कोणाचा राजकीय लव्ह जिहाद झालेला आहे? या अमित शाहांच्या प्रश्नांना उत्तर द्यायची उबाठा सेनेची हिंमतच नाही, असं नितेश राणे म्हणाले. ज्या सुप्रिया सुळेंचं ते कालपासून अभिनंदन करत आहेत, त्यांनीदेखील तिहेरी तलाकचं समर्थन केलं आहे. अमित शाह यांनी काल ‘समान नागरी कायदा’ आणणार, असे ठणकावून सांगितले, यावर उबाठा सेनेची उत्तर द्यायची हिंमत आहे का? असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला. हिंमत असेल तर या सगळ्या विषयांवर संजय राऊतांनी बोलून दाखवावं, असं आव्हान नितेश राणेंनी दिलं.

राम मंदिराचं समर्थन करुन दाखवा

अमित शाहांनी काल अयोध्येमध्ये बनणार्‍या भव्य राम मंदिराचा उल्लेख केला. मग महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना, जितेंद्र आव्हाड, अब्बु आझमी, हसन मुश्रीफ यांना घेऊन राम मंदिराला समर्थन करायची तुमची हिंमत आहे का? असं नितेश राणे म्हणाले.

उद्धव ठाकरे खोके पुरवणा-यांचेच शब्द पाळतात

बाळासाहेब ठाकरेंचा शब्द बंदुकीच्या गोळीसारखा होता, एकदा निघाला की परत मागे जात नसे आणि त्यांच्या शब्दाला किंमत होती. मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कोणालाही दिलेला शब्द पाळला नाही. उद्धव ठाकरे केवळ पाटणकर, सरदेसाई आणि त्यांच्या घरी खोके पोहोचवणारे लोक, वसुली करणारे लोक यांचेच शब्द पाळतात, असा आरोप नितेश राणेंनी केला.

संजय राऊतांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही

संजय राऊतांचा शिवसेनेच्या जडणघडणीशी काहीही संबंध नाही. शिवसेनेचा वाघ कोणी रेखाटला आहे, हेही साधं संजय राऊतांना माहित नाही. शिवसेनेला जे लोकसभेमध्ये बसून शिव्या द्यायचे, त्यांनी आम्हांला जुन्या शिवसेनेचे दाखले देऊ नयेत, असं नितेश राणे म्हणाले.

राष्ट्रवादीचा उमेदवार उभा करणार का?

संजय राऊत कालपासून भाजपच्या कल्याण-डोंबिवली मतदारसंघाबाबत फार बडबड करत आहेत. त्यांनी एक सांगावं की, २०२४ वरळी विधानसभेचा उमेदवार राष्ट्रवादीचा असणार का? वरळी विधानसभेची जागा राष्ट्रवादीचे सचिन अहिर सातत्याने जिंकत होते. त्यांना शिवसेनेने पक्षात समाविष्ट करुन घेतलं. आता त्या जागेवर आदित्य ठाकरे आमदार आहेत. मूळ जागा राष्ट्रवादीची असल्याने त्यांनी ती २०२४ च्या निवडणुकीसाठी मागितली आहे. उद्धव ठाकरे स्वतःच्या मुलाची जागा देऊ शकत नाहीत, मग संजय राऊत कल्याण-डोंबिवलीबद्दल कुठल्या तोंडाने बोलतायत? असं नितेश राणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -