नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे
प्रसिद्ध उर्दू शायर कैफी आझमी यांनी लिहिलेली ‘दबा दबासा सही, दिलमे प्यार हैं के नहीं?’ असा हळुवार प्रश्न विचारणारी ही गझल आजही ‘दर्दी’ लोकांच्या चांगलीच स्मरणात आहे.
कुलजित पाल यांनी निर्माण केलेल्या, ‘अर्थ’चे दिग्दर्शक होते महेश भट. कथाही त्यांचीच होती. शबाना आझमी, कुलभूषण खरमंदा, स्मिता पाटील, रोहिणी हट्टंगडी, राज किरण, सिद्धार्थ काक यांच्या भूमिका असलेला हा सिनेमा १९८२च्या डिसेंबरमध्ये रिलीज झाला.
‘अर्थ’ने तब्बल पारितोषिके ६ पटकावली. तसे त्याचे नामांकन एकूण १० पारितोषिकांसाठी झाले होते. शबाना आझमी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा, तर केशव हिरानी यांना सर्वोत्तम एडिटिंगचा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला. ‘बंगाल फिल्म पत्रकार संघाचा’ सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा पुरस्कार मधुकर शिंदे यांना, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा रोहिणी हट्टंगडी यांना मिळाला. सिनेमाला सर्वोत्कृष्ट संवादलेखनाचा पुरस्कारही मिळाला होता.
आज हा सिनेमा लक्षात आहे तो मात्र त्यातील कैफी आझमी यांच्या हृदयस्पर्शी गझलांसाठी आणि जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांच्या संगीतासाठी, खरे तर गाण्यांचा आशय गहिरा करणाऱ्या त्यांच्या आवाजासाठी!
सिनेमाची ‘मारूपदियम (१९९३) या नावाने तमिळ आवृत्तीही निघाली होती. ती काढली होती बालू महेंद्र यांनी, तर पाकिस्तानी अभिनेते-निर्माते शान शाहीद यांनी २०१७ला उझ्मा हसन, हुमैमा मलिक आणि मोहीब मिर्झा यांना बरोबर घेऊन अर्थची पाकिस्तानी आवृत्ती उर्दूतून ‘अर्थ – द डेस्टिनेशन’ या नावाने काढली.
या पाकिस्तानी सिनेमाचे एक वैशिष्ट्य म्हणजे ‘सिलसिला’त जसे अमिताभच्या आवाजत अतिशय रोमँटिक अशी स्वगते गुंफली आहेत तसेच शान शाहीद यांनी ‘कुछ सफर मंजीलोसे शुरू होकर सफर पर ही खत्म हो जाते हैंं.’ ही कविता त्यांच्या खर्जातल्या प्रभावी आवाजात रेकॉर्ड केली होती. त्यातील ‘हमारे फैसलेही हमारे फासले हैंं.’ हे वाक्य मनाचा वेध घेते.
आधुनिक जगातील प्रेमाच्या अशाश्वततेची समस्या महेश भट यांनी सिनेमात नाट्यमयपणे मांडली होती. काहींच्या मते परवीन बाबीशी असलेल्या आपल्या गहिऱ्या नात्यातून प्रेरणा घेऊन भट यांनी ही काहीशी आत्मचरित्रात्मक कथा चित्रित केली होती. जुन्या काळी विवाहबाह्य प्रेमसंबंध, घटस्फोट, पुन्हा दुसरे प्रेम अशा गोष्टी हल्लीसारख्या वारंवार दाखवून, मनोरंजन जगाने लोकांच्या गळी उतरवलेल्या नव्हत्या. प्रेम आहे, विवाह झालेला आहे म्हणजे ते संबंध आयुष्यभरासाठी राहणार आहेत, अशी सर्वांचीच दृढ श्रद्धा होती. त्यामुळे एकदा प्रेमभंग, तोही लग्नानंतर झाल्यावर, शबाना कोसळली आहे. दुसरीकडे तिच्या पतीच्या प्रेमात पडून त्याच्याबरोबर राहणाऱ्या कवितालाही (स्मिता पाटील) अपराधीपणाच्या भावनेने घेरलेय. डॉक्टर तिला सिझोफ्रेनिया झाल्याचे सांगताहेत, तिला बरे करण्यासाठी पूजाचीच मदत मागताहेत!
कथेतील प्रचंड गुंतागुंत, तणाव महेश भट यांनी समर्थपणे हाताळला होता. त्यामुळे ‘अर्थ’मधील सर्वच पात्रांची मन:स्थिती त्यांची दु:खे प्रेक्षकांना सहज प्रभावित करून गेली. पतीने धोका दिल्यामुळे खचून गेलेल्या पूजाला धडपडणारा गायक – राज (राज किरण) भेटतो. तो तिला तिच्या मानसिक धक्क्यातून, डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी व स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मनापसून मदत करतो. त्यातून दोघांत नाजूक, अमूर्त भावनिक धागे निर्माण होतात.
पूजाला प्रेम या शब्दाचीच भीती बसल्यामुळे, आपल्या मनात पुन्हा कुणाविषयी प्रेमभावना निर्माण होऊ शकते, हे मान्य करायची तिच्या मनाची तयारीच नाही. एकदा जेव्हा राजचे एक गाणे रेकॉर्ड होत असते, तेव्हा पूजा तिथेच असते. योगायोगाने ते गाणे त्याच्याच भावना व्यक्त करणारे असते.
शबानाचे वडील आणि प्रसिद्ध उर्दू शायर कैफी आझमी यांनी लिहिलेली ही गझल आजही दर्दी लोकांच्या चांगलीच स्मरणात आहे. जगजीतसिंग यांनी तिला दिलेल्या संगीतामुळे आणि त्यांच्या खास खर्जातल्या शांत आवाजामुळे गझलेचा आशय प्रेक्षकांच्या मनात उतरतो. अतिशय भावुक अशा त्या रचनेचे शब्द होते –
झुकी झुकीसी नज़र, बेक़रार हैं के नहीं,
दबा दबासा सही, दिलमें प्यार हैं के नहीं,
झुकी झुकीसी नज़र…
आधी आलेल्या वेदनादायी अनुभवामुळे कमालीची कोमेजलेली, आपल्या कोशात गेलेली पूजा, प्रेमाची कबुलीच देऊ इच्छित नाही. तिला राज जणू समजावतो आहे, स्वत:चेच मन समजावून घ्यायला हळुवारपणे मदत करतो आहे, असा अतिशय तरल आशय कैफी आझमी यांनी फक्त ३ कडव्यांत बसवला होता. तो म्हणतो, ‘तूच बघ तुझ्या मनात किती घालमेल सुरू आहे. आपल्या प्रेमाची कबुली तू स्वत:च्या मनालाही देत नसल्याने तुझे मन किती बेचैन आहे! जरा विचार कर, मनाच्या तळाशी खोल तुलाही माझ्याबद्दल ओढ वाटते आहे, तुझ्याही मनात माझ्याइतकेच प्रेम आहे…
तू अपने दिलकी जवां धड़कनोंको गिनके बता,
मेरी तरह तेरा दिल बेक़रार हैं के नहीं,
दबा दबासा सही दिलमें प्यार हैं के नहीं,
झुकी झुकी सी नज़र…
जेव्हा माणसाच्या मनात प्रेमाची पवित्र भावना जन्माला येते. तो क्षण परमोच्च आनंदाची अनुभूती देणारा असतो. तुला आपल्या रित्या जीवनात त्या क्षणाच्या आगमनाची उत्सुकता कशी नाही? जरा मनाला मोकळे सोडून बघ. तुलाही पटेल जे मला जाणवते आहे जे प्रेम तुलाही जाणवेल –
वो पल के जिसमें मोहब्बत जवां होती हैं,
उस एक पलका तुझे, इंतज़ार हैं की नहीं,
दबा दबासा सही, दिलमें प्यार हैं के नहीं,
झुकी झुकी सी नज़र…
तुझा होकर येईल, या आशेवर मी सगळ्या जगाला लाथाडून तुझ्याकडे आलो आहे. मग प्रिये, तुलाही स्वत:च्या प्रेमावर, स्वत:वर तितकाच विश्वास आहे ना? जरा अंतर्मुख होऊन विचार कर, बघ, तुझ्या लक्षात येईल की तू मनात खोलवर दाबून ठेवत असशील तरी तुझ्याही मनात माझ्या प्रीतीची स्फंदने धडधडत आहेतच.
तेरी उम्मीदपे ठुकरा रहा हूँ दुनियाको,
तुझे भी अपनेपे ये ऐतबार हैं के नहीं, दबा दबासा सही दिलमें प्यार हैं के नहीं,
झुकी झुकी सी नज़र…
हल्ली प्रेमाची अनुभूती किती सखोलपणे, तरलपणे होते, माहीत नाही. पण प्रेमाची अभिव्यक्ती ही आता समस्याच राहिलेली नाही! चटकन प्रेम व्यक्त केले जाते, ते संपल्यावर चटकन सांगितलेही जाते व पुन्हा दुसऱ्या संबंधाना पहिली व्यक्ती सहज संमती देते, प्रसंगी मदतही करते. सगळेच सोपे, हलकेफुलके! कदाचित वरवरचे! अशा काळात ही असली ‘दबा दबासा सही, दिलमे प्यार हैंं के नही?’ असा हळुवार प्रश्न विचारणारी गाणी कुणाला भावतील देव जाणे! पण ३०/४० पेक्षा जास्त वय असलेल्या अनेकांच्या मनात अशा गाण्यांसाठी एक हळवा कोपरा आजही राखीव आहे, हे मात्र खरे!