Monday, April 21, 2025

कोकीळ…

कथा : रमेश तांबे

कोकीळ मनाशीच पुटपुटला, ‘आता माझा गोड आवाज ऐकून माणूसच येईल मला शोधत रानावनांत.’ मग कोकीळ शिरला एका आमराईत अन् कुहू कुहू करू लागला.

एक होता कोकीळ, काळ्या काळ्या रंगाचा. गोड गोड आवाजाचा! वसंत ऋतू एप्रिल महिन्यात सुरू व्हायचा. कोकीळला तो खूप आवडायचा. वसंत ऋतूत कोकीळ आनंदून जायचा. त्याला वाटायचं आपण किती छान गातो. पण रंग आपला काळा. त्यामुळेच माणसं आपल्याला जवळ करीत नाहीत. काय बरे करावे? कुणाला बरे विचारावे? म्हणून कोकीळ गेला कावळ्याकडे अन् म्हणाला, ‘कावळ्या कावळ्या ये इकडे. तुझा रंग काळा, आवाज तुझा कर्कश तरीसुद्धा तू माणसांजवळ राहातोस. ते तुला खाऊ-पिऊ घालतात. मुलांना तुझ्या गोड गोष्टी सांगतात. सांग ना रे मला, माणसं अशी का वागतात?’ कावळा म्हणाला ‘कुणास ठाऊक?’

मग कोकीळ गेला चिमणीकडे अन् म्हणाला, ‘चिऊताई चिऊताई थांब ना गडे! रंग तुझा राखाडी, आवाज तुझा नाजूक. तान नाही की सूर नाही. तरी माणसं तुला जवळ करतात. चिऊताई ये ना ये ना असं म्हणत साकडं घालतात. तुझ्यासाठी चारापाणी, घरट्याची सोय करतात. सांग ना मला, माणसं अशी का वागतात?’ चिमणी म्हणाली, ‘कुणास ठाऊक?’

कोकीळ निराश झाला. माणसं अशी का वागतात? ते त्याला कळेना. मग एक दिवस त्याने ठरवलं, आपणच माणसांकडे जायचे, त्यांचे वागणे कसे ते बघायचे. मग कोकीळ उडाला आंब्याचं झाड सोडून, सकाळपासून दमला होता कुहू कुहू करून. उडता-उडता एका घरासमोर पोहोचला. जिथे रोज कावळा बसतो तिथेच बसला. थोड्याच वेळात कोकीळला बघून कुणीतरी खरकटे त्याच्या दिशेने भिरकावले. हात धुतलेले पाणीदेखील फेकले. ते त्याने कसेबसे वाचवले. पाणी फेकून माणूस घरात निघून गेला. त्याने कोकीळला ओळखलेच नाही. आता मात्र कोकीळच्या लक्षात आले. या माणसांच्या मागे धावण्यात काहीच अर्थ नाही. ज्याला कावळा अन् कोकीळ मधला फरक कळत नाही. आपला रंग आणि आपला आवाज हीच आपली ओळख. माणसांच्या जवळ जाऊन खरकटे अन्न अन् घाणेरडे पाणी अंगावर घ्यायलाच नको!

मग कोकीळ उडाला अन् मनाशीच पुटपुटला, ‘आता माझा गोड आवाज ऐकून माणूसच येईल मला शोधत जंगलात, रानावनांत, आमराईत.’ मग कोकीळ शिरला एका आमराईत अन् कुहू कुहू करू लागला. स्वतःच्या आनंदासाठी!

तेवढ्यात त्याला मुलांची सहल येताना दिसली. मुलं छान, हसरी अन् खेळकर होती. त्यांना पाहून कोकीळ तानावर ताना देऊ लागला. तशी मुलं ओरडली, ‘कोकिळा… कोकिळा गातेय!’
आता मुलं बोलू लागली, कोणी म्हणालं, ‘अरे कोकिळा काळी असते म्हणे’. दुसरा म्हणाला, ‘कोकिळेचा आवाज किती गोड असतो ना!’ तर तिसरी मुलगी म्हणाली, ‘कोकिळा फक्त वसंत ऋतूतच गाते बरं का!’ कोकीळ कान देऊन मुलांचं बोलणं ऐकत होता. ते कौतुकाचे शब्द ऐकून कोकीळ मात्र अगदी खूश झाला होता. तितक्यात एक चुणचुणीत मुलगा म्हणाला, ‘अरे वा! काय सुरेख आवाज आहे ना! पण दिसत नाही मला, कुठे लपलीय ती कुणास ठाऊक?’

मुलांच्या गप्पा ऐकून सर म्हणाले, ‘मुलांनो, तुम्हाला माहीत आहे का! जो सुंदर आणि गोड आवाजात गातोय तो नर कोकीळ आहे बरं! मादी कोकिळेला नाही गाता येत… समजलं!’

सरांचं बोलणं ऐकून मुलं आश्चर्यचकित झाली! ‘बघा मुलांनो, कसं जगावं ते कोकीळकडून शिकावं. कुणापुढेही न मिरवता आपण आपले गाणे गावे! आपण स्वतः आनंद घ्यावा. तो इतरांनाही वाटावा. आपल्याकडे जे आहे त्यात आनंदी राहावे.’ सरांचे बोलणे कोकीळचा स्वाभिमान फुलवून गेला. मग कोकीळ अजून जोरजोरात ‘कुहू कुहू’ करू लागला!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -