Sunday, August 3, 2025

'सर्कस' कविता आणि काव्यकोडी

'सर्कस' कविता आणि काव्यकोडी

  • एकनाथ आव्हाड


सर्कस


गावात आमच्या
सर्कस आली...
पोरासोरांची
मज्जा झाली...

सर्कशीचा तंबू
गावात उभा...
पोराची गर्दी
होतेय तोबा...

सर्कशीत होते
कितीतरी प्राणी...
खेळायचे, नाचायचे
म्हणायचे गाणी...

जादूगार करायचा
मोठीच कमाल...
विदूषक हसवून
आणायचा धमाल...

सर्कस पोरांच्या
आवडीची झाली...
रोजच हजेरी
तेथे लागली...

परीक्षेत सर्कशीवर
निबंध आला...
पोरांनी निबंध
छानच लिहिला!

काव्यकोडी


१) हिरव्या हिरव्या पानांची
ही हिरवी पालेभाजी
आरोग्याचे पोषक घटक
देण्यात असते राजी.

भजी करा, भाजी करा
पनीरमध्ये घाला
या भाजीचे नाव आता
लवकर सांगा मला?

२) सँडविचमध्ये वापरतात
सलाड बनवून खातात
कधी कधी याचा
रस बनवून पितात.

कापल्यावर रक्तासारखे
लाल आत दिसते
पोटॅशियम, फोलेट घटक
कोणात फार असते?

३) दही घुसळून पाणी घालून
हे येते बनवता
याच्यापासून स्वादिष्ट
कढीही येते करता

यातील आंबटपणामुळे
रुची आपली वाढते
कोणतं हे पेय त्यात
लॅक्टिक ॲसिड असते?

उत्तर -


१) पालक
२) बीट
३) ताक

eknathavhad23@gmail.com
Comments
Add Comment