-
मायभाषा: डॉ. वीणा सानेकर
गेली अनेक वर्षे मी शिक्षणक्षेत्राशी जोडलेली आहे. प्राध्यापिका म्हणून कार्यरत असताना विविध विषयांची निवड करत असताना प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थी आणि पालक भाषा विषयाकडे कसे पाहतात, हे अनुभवले आहे. मोठ्या इंग्रजी शाळांमधून आलेली मुले जवळपास मराठीवर फुलीच मारतात. त्यातली बरीच मुले हिंदीकडे व माहिती तंत्रज्ञान या विषयाकडे वळतात, तर काही संस्कृतची निवड करतात. जिथे फ्रेंच, जर्मन किंवा जपानी ही भाषा होती, तिथे तिथे पुढेही अशीच विदेशी भाषा निवडतात.
मध्यंतरी अनेक इंग्रजी शाळांमध्ये मराठी हा विषय नव्हता, पण संस्कृत होता. नि अनेक शाळा आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक असल्याचा दावा करीत असल्याने तिथे विदेशी भाषा अभ्यासक्रमात असल्याने मराठीला जागाच नव्हती. मग केवळ मराठी शाळांमध्ये शिकलेली मुलेच पुढील टप्प्यावरील शिक्षणात मराठी हा विषय निदान बारावीपर्यंत घेतात. मराठी शाळा आणि इंग्रजी शाळा हा मुद्दा भाषाविषयक विवेचनात पुन्हा पुन्हा येणारा मुद्दा आहे, कारण इंग्रजी शाळांनी मुलांना मराठीपासून तोडण्याकरिता घाव घातले, हे तर खरेच!
मराठीपासून तोडणे हे तितकेच मर्यादित नव्हते. समग्रपणे पाहायचे, तर या घावांचे परिणाम अधिक खोल होते. कारण मराठी भाषेपासून तुटतानाच या मुलांचे बंध मराठी संस्कृती, एकूण आपल्या सामाजिक सांस्कृतिक वारशापासून निखळत गेले होते. या सर्वांचे दुष्परिणाम एकूणच जगण्यावर घडले. पण याची कबुली देण्याचे धाडस किती पालकांकडे आहे? इंग्रजी शाळेत शिकवू आणि आपल्या भाषेशी व संस्कृतीशी त्यांना जोडून ठेवू, हे म्हणणे सोपे आहे. पण प्रत्यक्षात तसे असणे कठीण आहे. एका अर्थी ही सर्व मुले आपल्या भाषिक, सांस्कृतिक पर्यावरणापासूनच विस्थापित होतात. दुसऱ्या बाजूने इंग्रजी माध्यमाशी जुळवून घेणे सर्वच मुलांना सोपे नसते. काही मुलांना परक्या भाषेचे ओझे इतके होते की, सरळसरळ या मुलांचे खच्चीकरण होत जाते. इंग्रजीशी व त्या शाळांमधील अपेक्षांशी जुळवून घेता न आल्याने ही मुले आपला आत्मविश्वास गमावतात. याचे दूरगामी परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर दिसतात.
काही पालक वेळीच लक्षात आल्याने माध्यमबदल करून घेतात, तर काहींना खोट्या प्रतिष्ठेपायी हे कमीपणाचे वाटते. मूल इंग्रजी माध्यमाचे ओझे पेलू शकत नाही, हे कबूल करायलाच हे पालक तयार नसतात व योग्य वेळी निर्णय न घेतल्याने या मुलांचे आयुष्यभराचे नुकसान होते.मी असे अनेक पालक अवतीभवती पाहते, जे आपल्या हट्टापायी मुलांचे नुकसान करतात. कारण, ज्या वयात मुले शाळेत घातली जातात, त्या वयात मुलांकडे माध्यमनिवडीची क्षमता नसते. ती असती, तर मुलेच पालकांना म्हणाली असती की, “मला माझ्या भाषेत शिकवा, कारण तो माझा हक्क आहे.”
मला नेहमी वाटते की, इंग्रजी माध्यमाशी ज्यांच्या मुलांना जुळवून घेता आले नाही त्यांचे अनुभव समाजासमोर आले पाहिजेत. ते आले, तर एक वेगळी बाजू समाजासमोर येईल. इंग्रजी शाळा म्हणजे यशाची किल्ली, असे सरसकटपणे समजणाऱ्या पालकांना आंधळेपणाने माध्यमनिवड करणे उचित नाही, हे तरी कळेल. मराठी शाळादेखील या कामात आपला वाटा उचलू शकतील, कारण इंग्रजी माध्यमाशी जुळवून न घेता आल्याने अनेक मुले परत मराठी शाळांंत आली. त्या मुलांच्या पालकांचे अनुभव मराठी शाळांना नोंदवून ठेवता येतील. हे अनुभव अधिकाधिक पाालकांपर्यंत पोहोचले पाहिजे. पण त्याकरिता अशा पालकांनी आपल्या चुकीची कबुली तर द्यायला हवी! ती देणे भल्याभल्यांना जमत नाही.