-
दृष्टिक्षेप : अनघा निकम-मगदूम
‘स्त्री’ या शब्दातच किती भावानांची वलये आहेत. कितीतरी रूपाने ती जगासमोर उभी रहाते. तिच्या प्रत्येक रूपाचे अप्रूप आणि कदाचित पौरुष्य दाखवणाऱ्या समाजाला हेवा सुद्धा वाटतं असावा. कितीही मोडून पडली तरीही कुठल्याही परिस्थितीत पुन्हा जिद्दीने उभी राहते ती ‘स्त्री’. आपल्याबद्दलच्या, आपल्यातल्या अनेक गैरसमजांना खोटं ठरवत, लढत, संघर्ष करत ती जोमाने उभी राहते. आपलं छोटं घरटं उभं करतेच, पण सुरक्षित ठेवते. आपल्या प्रेम मायेने ते ऊबदार करते. अशा स्त्रीला मोडायचं तर किती सोपं आहे. तिच्या मनावर आणि मग शरीरावर ओरखडे उमटले की ती कोलमडते, थिजून जाते, संपून जाते.
हेच खूप काळापासून सुरू आहे. स्त्रीला बदनाम करायचे, तिला मानसिक आणि मग अत्यंत टोकाचा शारीरिक त्रास द्यायचा. किती सहन करत स्त्री आली आहे. तिच्यावर होणारा अन्याय ती निर्धाराने उलटवून लावेल, पण तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराने ती दिगमूढ होते. आत्मसन्मानाला ठेच लागली की, हरते. हेच शस्त्र तिला संपविण्यासाठी वापरलं जात आलं आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याला आवाज मिळू लागला आहे. निर्भयावरील अनन्वित अत्याचारला सध्याच्या सोशल मीडियामुळे वाचा फुटली. निर्भया हे जग सोडून गेली, पण तिच्या वारसदारांसाठी एक भक्कम आवाज बनून गेली. पण त्यानंतरही स्त्रियांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. तिच्यावर होणाऱ्या अत्याचारांनी क्रूरतेच्या परिसीमा गाठल्याचेच दिसून येतं आहे. कितीतरी रक्त गोठवून टाकणाऱ्या घटना, निःशब्द करणारे प्रसंग दररोज दिसून येत आहेत. दिल्लीत तुकड्यांमध्ये आपला जीव गमावलेली श्रद्धा असो किंवा मागच्याच महिन्यात दिल्लीत भर रस्त्यात, लोकांसमोर सपसाप चाकूचे वार सहन करून मृत पावलेली साक्षी असो, नाहीतर महिलांवर किती क्रूरता दाखवावी याही कल्पनेच्या पलीकडे गेलेली मीरा रोडवरची सरस्वती असो. एक फ्रिजमध्ये तुकड्याने सापडली, तर दुसरीच्या शरीराचे तुकडे कुकरमध्ये होते. काय आणि किती बोलायचं या क्रूरतेबद्दल? नाजुकतेच्या परिभाषेत जे संबोधलं जातं, त्या स्त्रीच्या शरीराची विकृतपणे तुकडे करून त्याची अमानवीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करायचा… कुठून येते ही क्रूरता, निष्ठुरता, मन ठार मारून अत्याचार करण्याची ही हिम्मत येते कुठून? गेल्या काही प्रसंगात, तर लिव्ह इन रिलेशनशिप किंवा प्रेमाचं अनेक वर्षे नाते जपून मग अनेकांचे आयुष्य संपवल्याच्या घटना ठळकपने पुढे येतात.
एक स्त्री म्हणून हे लिहिताना सुद्धा तीव्र चीड निर्माण होतेय आणि प्रश्न निर्माण होतो, आज समाज इतका सोशल झाला आहे, प्रत्येक गोष्टींवर रिॲक्ट होताना दिसतोय मग अशा वेळी तो माणुसकी, दया, प्रेम भावना कुठे गेल्या आहेत? समाज पुढरतोय, आयुष्याला बुलेट ट्रेनचा वेग आला आहे. मग हे आधुनिक जगणं भावनाशून्य आहे का? मन ही गोष्ट संपली आहे का? नक्की माणूस म्हणून शिल्लक उरणार आहोत का? की आपली पावले ‘पशू’ या दिशेने पडू लागली आहेत.