प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ
आपण चांगल्या मार्गाने जो पैसा मिळवतो, त्यातील छोटासा भाग चांगल्या कार्यासाठी जर खर्च झाला, तर त्याचा आनंद हा द्विगुणित होतो. अशात वाढदिवशी खाऊ वा गरजेच्या वस्तू वाटता आल्या, तर आपल्या मुलांच्याही समाजाप्रति जाणिवा जागृत होतील.
तुकाराम महाराज यांचे एक एक वचन आजच्या काळातही लागू होते –
जोडोनिया धन। उत्तम व्यवहारें।
उदास विचारें। वेच करी॥
उत्तमची गती। तो एक पावेल।
उत्तम भोगील। जीव खाणी॥
प्रामाणिकपणे म्हणजे उत्तम व्यवहाराने एखाद्याने पैसा जमवला आणि तो तटस्थपणाने किंवा निस्वार्थी विचाराने त्याचा चांगला उपयोग म्हणजे ‘उत्तम विनियोग’ केला, तर त्याला उत्तम गती प्राप्त होते. म्हणजे त्याचे कल्याण होते. पुढे असेही म्हटले की, त्याला अतिशय उत्तम असे जन्मही प्राप्त होतात. ऐहिक वा पारलौकिक गतीसाठी ‘गती’ हा शब्द त्यांनी वापरलेला असावा!
तुकाराम महाराज यांचे अभंग मला नेहमीच आवडतात कारण अतिशय सोप्या भाषेत कोणालाही समजेल अशा भाषेत ते आहेत. त्याचा संबंध प्रत्यक्षपणे आपल्या जीवनाशी असतो.
हे आठवायचे कारण म्हणजे काल कोणीतरी एक पत्र हातात दिले जे पत्रक होते ‘आव्हान पालक संघा’चे! ज्यात आव्हान केले होते –
जन्मत:च किंवा जन्मानंतर शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व आलेल्या विशेष मुला-मुलींच्या पालकांनी एकत्र येऊन नियतीचे आव्हान स्वीकारत सुरू केलेली कार्यशाळा म्हणजे ‘आव्हान पालक संघ’ ही संस्था. येथे मुलांच्या अंगभूत गुणांचा कौशल्याने वापर करून त्यांच्याकडून दैनंदिन वापरातील छोट्या-मोठ्या वस्तू बनवून घेऊन त्यांना अंशतः स्वावलंबी करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांना काम करण्यास प्रोत्साहन म्हणून दरमहा काही ठरावीक रक्कम दिली जाते.
आता हे एका संस्थेचे आवाहन आहे. अशा अनेक संस्था आहेत. ज्या संस्थांद्वारे या विशेष मुलांकडून राख्या, कागदी फुले, तोरणे, विविध प्रकारचे हार, डायऱ्या, बटवे, स्टॅन्डच्या छोट्या गुढ्या अशा विविध वस्तू तयार करून घेतल्या जातात. याशिवाय नोकरी करणाऱ्या महिलांसाठी सोललेले वाल, भाजणी पिठे, किसलेले खोबरे इत्यादींची विक्री केली जाते. यातील सगळ्याच वस्तू आपण बाजारातून विकत घेतो आणि वापरतोच; परंतु अशा काही संस्था असतील त्यांच्याकडून या वस्तू आपण जर खरेदी केल्या, तर या अपंगात्वावर मात करून कार्य करणाऱ्या मुलांना मदत होते. शेवटी तुकारामाने सांगितल्याप्रमाणे, आपण अतिशय चांगल्या मार्गाने जो पैसा मिळवतो. त्यातील छोटासा भाग का होईना चांगल्या कार्यासाठी जर खर्च झाला, तर त्याचा आनंद हा द्विगुणित होतो. आजच्या काळात ‘कोणत्याही प्रकारचे अपंगत्व असणारी मुले’(विशेष मुले), ‘अनाथ मुले’, ‘शाळाबाह्य मुले’, ‘दारिद्र्यरेषेखालील मुले’ असणाऱ्या अनेक संस्था या केवळ देणग्यांतून चालतात. अशा संस्थांतील मुलांकडून, त्यांना विविध कामे/कला शिकवून त्यातून त्यांचा आर्थिक स्तर वाढवला जातो. त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांना हात देऊन पूर्णत्वाने सक्षमतेने उभे करण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलणे आवश्यक आहे.
आतापर्यंत मी फक्त आर्थिक मदतीविषयी लिहिले. मध्यंतरी कोणीतरी मला त्यांच्यासोबत एका अनाथ मुलांच्या शाळेत घेऊन गेले. तेथे त्या व्यक्तीसोबत मी मुलांना कथा/कविता ऐकवून त्यांचे मनोरंजन केले. त्यांना साहित्यात रस घेण्यास शिकवले. साहित्य निर्मितीसाठी प्रवृत्त केले. म्हणजे आपण पैसा देऊ शकलो नाही तरी थोडासा वेळ देऊन आपले ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवले तरी ती सुद्धा एक फार मोठी समाजसेवा आहे! आपल्या वाढदिवसाच्या दिवशी किंवा आपल्या मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना अशा संस्थांमध्ये नेऊन खाऊ किंवा गरजेच्या काही वस्तू वाटता आल्या, तर आपल्या मुलांच्याही समाजाप्रति जाणिवा जागृत होतील. आजच्या काळात याची ही फार मोठी गरज आहे. कालच एका वृद्धाश्रमाला भेट दिली. असाच छोटेखानी कवितांचा कार्यक्रम केला. निरोप घेताना एक आजी जवळ येऊन म्हणाल्या, ‘तुझी एकही कविता कळली नाही. वाईट वाटून घेऊ नकोस. दोष तुझा नाही. मला अजिबातच ऐकू येत नाही म्हणून, तर कंटाळून मुलाने इथे आणून टाकले. ते असो…; परंतु आम्हाला आमच्या रुटिन जीवनाचा कंटाळा येतो. तेच ते चेहरे पाहूनही कंटाळा येतो. अशा वेळेस तू आलीस. हातवारे करून काहीतरी ऐकवलेस तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरील हास्य पाहून मन प्रफुल्लित झाले. आता हाच हसरा चेहरा पुढच्या आठवडाभर तरी डोळ्यांसमोर राहील. धन्यवाद बेटा!’
‘कृतकृत्य होणे’ म्हणजे काय ते अनुभवले. चला तर आपण सगळ्यांनी छोटेसे तरी समाजकार्य करूया. आपल्या घराच्या आसपास असणाऱ्या, एखाद्या दवाखान्यात जाऊन ज्या रुग्णाला भेटायला येणारे कोणीही नातेवाईक नसतात, त्या रुग्णाची जाऊन विचारपूस करू या. अगदी बाहेर जाता आले नाही तरी, घरातल्या प्रत्येकाशी त्याच्या आवडत्या विषयावर काही क्षण तरी बोलूया. कमीत कमी कुणाला बोलावसं वाटत असेल, तर थांबून शांतपणे ऐकू या! अनेक जन्म आहेत की नाही माहीत नाही, या जन्मी खऱ्या अर्थाने थोडेसे जगू या!