Friday, March 21, 2025
Homeताज्या घडामोडीकाँग्रेसने मुंबई अध्यक्षपदावरुन भाई जगताप यांना का हटवले?

काँग्रेसने मुंबई अध्यक्षपदावरुन भाई जगताप यांना का हटवले?

मुंबई : मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून आमदार भाई जगताप यांना हटवण्यात आले असून त्यांच्या जागी आमदार व माजी मंत्री वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आमदार भाई जगताप हे आक्रमक स्वभावाचे ओळखले जातात. भाई जगताप यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर मुंबईत काँग्रेसने विविध मुद्यांवर आंदोलने देखील केली. आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठीची चाचपणी सुरू केली होती. असे असताना भाई जगताप यांना एका अहवालामुळे दूर सारण्यात आल्याची चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांना पहिल्या पसंतीचे उमेदवार असूनही पराभव स्वीकारावा लागला. तर, दुसऱ्या पसंती क्रमाचे उमेदवार भाई जगताप मात्र विजयी झाले. हंडोरे यांच्या पराभवामुळे काँग्रेसबद्दल अनुसूचित जातींच्या वर्गामध्ये नाराजी होती.

त्यातच विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी समिती नेमली होती. या समितीचा अहवाल काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी काँग्रेस हायकमांडला सादर केला. या अहवालात हंडोरे यांच्या पराभवाला भाई जगताप हेच कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या अहवालानुसार जगताप यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली.

मागील वर्षी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे प्रथम क्रमांकाचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभवच भाई जगताप यांना भोवला असल्याची चर्चा आता सुरू आहे.

दरम्यान, मुंबई काँग्रेसचे मावळते अध्यक्ष भाई जगताप यांनी म्हटले आहे की, मला पदावरून हटवले नाही. या उलट माझ्याशी बोलून हा निर्णय घेतला गेला असल्याचे त्यांनी म्हटले. वर्षा गायकवाड यांचा फायदा नक्की पक्षाला होईल. दलित चेहरा वगैरे असे काही मतभेद काँग्रेस करत नाही. सर्वांना घेऊन चालणारं नेतृत्व म्हणून वर्षा गायकवाड यांची नेमणूक झाली असल्याचे भाई जगताप यांनी म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -