मुंबईच्या अध्यक्षपदी वर्षा गायकवाड, गुजरातच्या प्रदेशाध्यक्षपदी खासदार शक्तीसिंह गोहील तर पुद्दुचेरी प्रदेशाध्यक्षपदी खासदार वैथिलिंगम यांची नियुक्ती
मुंबई/नवी दिल्ली : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली असून पक्षाचे पदाधिकारी बदलण्यात येत आहेत. त्यानुसार आगामी मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मुंबई अध्यक्षपदावरून भाई जगताप यांना हटवले असून त्यांच्या जागी दलित चेहरा असलेल्या आमदार व माजी मंत्री वर्षा गायकवाड यांची नियुक्ती केली आहे.
काँग्रेसने गुजरातच्या प्रदेशाध्यक्षपदी खासदार शक्तीसिंह गोहील यांची नियुक्ती केली आहे. पुद्दुचेरी प्रदेशाध्यक्षपदी खासदार वैथिलिंगम यांची नियुक्ती केली आहे. तर आमदार वर्षा गायकवाड यांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने हा निर्णय घेतला असून, अधिकृतपणे पत्र काढले असून या तिन्ही नियुक्त्या तात्काळ प्रभावाने करण्यात आल्या आहेत.
वर्षा गायकवाड यांचे वडिल एकनाथ गायकवाड हे खासदार राहिले आहेत. तेही मुंबईचे अध्यक्ष होते. वर्षा गायकवाड या धारावी विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आल्या आहेत. गायकवाड या सर्वसमावेशक, सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व आहे. तसेच दलित आणि मुस्लिम मतदारांमध्ये त्यांचा प्रभाव आहे. गायकवाड यांचा मुंबईत चांगला जनसंपर्क आहे.
वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करून काँग्रेसकडून अनुसूचित जातींच्या मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे म्हटले जात आहे. मागील काही वर्षात अल्पसंख्याक, अनुसूचित जाती-जमाती आदी काँग्रेसचा मतदार घटक पक्षापासून दूर गेला होता.