Sunday, April 27, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखनात्यांची कटुता अन् क्रौर्याची परिसीमा...

नात्यांची कटुता अन् क्रौर्याची परिसीमा…

मानवी नातेसंबंधांबाबत साशंकता निर्माण व्हावी अशी महाभयानक कृत्ये आपल्या आजूबाजूला सध्या घडताना दिसत आहेत. अशा घटना वरचेवर घडत असल्यामुळे नात्या – नात्यांमधील सौहार्द संपुष्टात येऊन कमालीची जीवघेणी कटुता निर्माण का आणि कशी होते? या सगळ्या बिघडणाऱ्या किंवा बिघडण्यास कारणीभूत ठरणाऱ्या बाबी कोणत्या याचा गंभीरपणे विचार होणे गरजेचे आहे. विशेषत: समाजशास्त्रज्ञ मानसोपचार तज्ज्ञांनी समाजात वाढत चाललेल्या विकृतींना कसा आळा घालता येईल किंवा नात्यांमधील गोडवा टिकून राहावा यासाठी कोणत्या गोष्टी करणे गरजेचे आहे याचा साकल्याने अभ्यास करून त्यादृष्टीने उपाययोजना करणे ही काळाची गरज बनली आहे. दोन जीव प्रेमात पडतात काय, काही वर्षे प्रत्यक्ष नवरा – बायकोप्रमाणे एकत्र राहतात काय… आणि अचानक असे काय घडते की एकमेकांवर जीव ओवाळून टाकण्यासाठी घरादारासह आई – बाप, भावंडे, मामा, काका, आत्या अशा सर्व जवळच्या गणगोतांचा त्याग करून स्वत:चे वेगळे जग निर्माण करून राहणारे हे युगुल एकाचा जीव घेण्याच्या अमानुष कृत्यापर्यंत पोहोचते… हे सारे मन विषण्ण करणारे आहे. आपली नवी पिढी फरच सजग, हरहुन्नरी, स्वातंत्र्याचा आणि स्वावलंबनाचा पुरेपूर, योग्य प्रकारे अवलंब करणारी नक्कीच आहे. पण एखादी घटना चक्रावणारी घडली की मनात भीती दाटून येते आणि समाजमनाबाबत गूढ अशी चिंता सतावू लागते. मुंबईत आणि जवळच्या मीरा रोड येथे घडलेल्या घटनांनी अवघा महाराष्ट्र कमालीचा हादरला आहे. एक घटना चर्नी रोड येथील शासकीय वसतिगृहात झालेल्या एका मुलीच्या हत्येच्या घटनेची आहे. या घटनेनंतर आता महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहांची सुरक्षा तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत.

तर मृत्यूलाही भीती वाटावी, कुणाच्याही काळजाचा थरकाप उडावा, अशी घटना मुंबईला लागून असलेल्या मीरा रोडमध्ये घडली. मीरा रोडच्या गीता आकाशदीप या इमारतीमध्ये राहणाऱ्या ५६ वर्षांचा मनोज साने याने त्याची ३२ वर्षीय लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्य हिची थंड डोक्याने हत्या करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी केलेले अगणित तुकडे या घटनेमुळे सारेच भांबावून गेले आहेत. क्रौर्याची परिसीमा गाठून संपूर्ण शहराला हादरवून सोडणाऱ्या या मीरा रोड हत्याप्रकरणातील आरोपी मनोज साने याने आपण एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळेच त्यांच्यात तणाव होता, असेही तो म्हणाला; परंतु हत्येच्या आरोपाखाली अटकेत असल्याने तो सातत्याने वेगवेगळे दावे करून दिशाभूल करण्याचाही प्रयत्न करत आहे असेच दिसते. मनोज साने याने प्रथम सरस्वतीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचे सांगितले होते. मी सरस्वतीची हत्या केलेली नाही, तर तिने विषप्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर हत्येचा आळ आपल्यावर येईल या भीतीने घाबरून आपण सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे तुकडे केले, असा दावा त्याने केला आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे मनोज साने याने आपल्याला श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावरून सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे करण्याची कल्पना सुचल्याचे सांगितले. वसईच्या श्रद्धा वालकर हिची तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पुनावाला याने अशाच प्रकारे हत्या केली होती. दिल्लीत राहात असलेल्या आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून त्यांची विल्हेवाट लावली होती. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले होते. तसेच मृतदेहाची दुर्गंधी लपवण्यासाठी रूम फ्रेशनर्स, अत्तरांचा मोठ्या प्रमाणात वापर केला होता. मनोज साने यानेदेखील सरस्वती वैद्य हिची हत्या केल्यानंतर निलगिरी तेलाच्या पाच बाटल्या खरेदी केल्या होत्या. मृतदेहाचे तुकडे करून मनोज साने ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकायचा, ते उकळायचा आणि मग मिक्सरमध्ये बारीक करायचा. त्यानंतर हे तुकडे तो पिशवीत भरून इमारतीच्या मागे असलेल्या गटारात फेकून द्यायचा.

मनोज साने आणि सरस्वती वैद्य राहत असलेला मीरा रोड येथील फ्लॅट भाड्यावर घेतला होता. करारनाम्यात फक्त मनोज साने याचे नाव होते. त्यामध्ये कुठेही सरस्वती वैद्यचा उल्लेखही नव्हता. गीता आकाशदीप हाऊसिंग सोसायटीतील रहिवाशांना मनोज साने आणि सरस्वती वैद्य हे पती-पत्नी आहेत, असे वाटत होते. मनोज आणि सरस्वती हे दोघे गेल्या तीन वर्षांपासून या फ्लॅटमध्ये राहत होते. या दोघांमध्ये सातत्याने खटके उडत होते. त्यामुळे मनोजने सरस्वतीची हत्या रागाच्या भरात केली की हे सर्वकाही नियोजनपूर्वक केले होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. नराधम मनोजने हे कृत्य नेमके का केले? सरस्वतीबाबत तो इतका निर्दयी आणि क्रूर कसा काय झाला? असे प्रश्न सध्या रुंजी घालत आहेत आणि मनाची चिंताजनक घालमेल वाढवत आहेत. अशा घटनांना कॉपीकॅट क्राईम कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. म्हणजे वास्तवात घडलेल्या एखाद्या गुन्ह्यावरून प्रेरणा घेऊन किंवा काल्पनिक गुन्ह्यांवर आधारित मालिका/चित्रपटांवरून तशाच प्रकारे केला जाणारा गुन्हा. तसे असेल तर अशा घटना घडू नयेत यासाठी पोलीस यंत्रणेचा धाक आणि कायद्याची जरब असणे अत्यंत आवश्यक असल्याचे येथे अधोरेखित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -