टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल
प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं… काहींना अभिनयाची आवड असते, तर काहींना गायनाची, नृत्याची, मैदानी खेळाची; परंतु प्रत्येकाची स्वप्न पूर्ण होतात, असं नाही. जीवनाच्या रहाटगाड्यात स्वप्न मागे राहून जातात. काही वेळेला ती स्वप्नं त्याची पुढची पिढी पूर्ण करते. असंच अभिनयाचं एक स्वप्न एका आईने पाहिलं होतं व ते तिच्या मुलीने प्रत्यक्षात पूर्णत्वास आणलं. ती मुलगी म्हणजे अभिनेत्री मोनालिसा बागल.
एकदा एका मध्यस्थामार्फत प्रसिद्ध लेखक सुश्रुत भागवत यांच्याशी मोनालीसाशी ओळख झाली. त्यावेळी ते ‘सौ. शशी देवधर’ या चित्रपटाचे लेखन करीत होते. अभिनेत्री सई ताम्हणकर यात सौ. शशी देवधरची भूमिका साकारत होती. तिच्या तरुणपणीच्या भूमिकेसाठी एका मुलीच्या शोधात ते होते. मोनालिसाला पाहिल्यानंतर लगेच त्यांनी तिला चित्रपटात काम करण्याविषयी विचारले. ती त्यावेळी कॉलेजला होती व कॉलेजला सुट्टी लागणार होती. त्यामुळे तिने चित्रपटात काम करण्याविषयी लगेच होकार दर्शविला. आईला अभिनयाची आवड होती; परंतु आईचे अभिनयाचे स्वप्न पूर्ण झाले नव्हते, ते स्वप्न तिच्या मुलीने पूर्ण केले व मिळालेल्या संधीचे सोने केले.
त्यानंतर दिग्दर्शक अनुप जगदाळे यांच्या ‘झाला भोबाटा’ या चित्रपटात रितसर ऑडिशन दिल्यानंतर मोनालिसाची निवड त्या चित्रपटात नायिकेसाठी झाली. अभिनेता मयूरेश पेम तिचा नायक होता. ‘पैजण कानामध्ये छुनछुन वाजतंय’ हे गाणं त्यावेळी खूप हिट ठरले. आज त्या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ४-५ वर्षे झाली; परंतु मोनालिसा कुठेही गेली तरी तिला त्या गाण्यासाठी ओळखलं जातं. त्यानंतर अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘गिरकिट’ या दुसऱ्या चित्रपटात मोनालिसाने प्रिया नावाच्या अल्लड मुलीच्या भूमिकेत दिसली. तिच्यासोबत तानाजी गलगुंडे, गिरीश कुलकर्णी हे कलावंत होते.
शशिकांत पवार एक ऐतिहासिक चित्रपट बनवित होते, दिग्दर्शनाची धुरा त्यांनी अनुप जगदाळेवर सोपवली होती. कलाकारांची निवड सुरू झाली होती. चित्रपटाचे नाव होते ‘राव रंभा’ दिग्दर्शक अनुप जगदाळे यांनी रंभेच्या भूमिकेसाठी मोनालिसाला बोलाविले. स्क्रीन टेस्ट, लूक टेस्ट झाली. दोन दिवसांनी मोनालिसाला कळविण्यात आले की, तिची रंभाच्या भूमिकेसाठी निवड झाली.
रंभेच्या भूमिकेसाठी मोनालीसाने जय्यत तयारी केली. तिने घोडेस्वारी शिकून घेतली. साहसदृश्यांची ट्रेनिंग घेतली. त्यावेळी मोनालिसा घोड्यावरून पडली, तिला खरचटलं, पण नव्या ताकदीने ती परत उभी राहिली. बाळकृष्ण शिंदे सरांकडून ऐतिहासिक भाषेचा लहेजा शिकून घेतला. या चित्रपटाचे लेखक प्रताप गंगावणे यांनी मोनालीसाला त्या वेळचा काळ सांगितला.त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणार होता, तेव्हाच्या मुलींचं बसणं, उठणं कसं होतं, त्या मुलींचा पेहराव कसा होता, त्यांची वेशभूषा कशी होती? या साऱ्या गोष्टी त्यांनी मोनालीसाला सांगितल्या. त्यांनी चित्रपटाची कथा सांगितली.
रंभा हे पात्र खूप धाडसी आहे, याची जाणीव मोनालीसाला झाली. चित्रपटाचे दिग्दर्शक अनुप जगदाळे यांनी प्रत्येक सीनच्या अगोदर त्यांच्याकडून प्रत्येक सीनचा सराव करून घेतला. छायाचित्रकार संजय जाधव यांचेही मोलाचे मार्गदर्शन तिला झाले. शिवरायांच्या काळातील एक प्रेमकथा यात पाहायला मिळेल. या सिनेमात मोनालिसाच्या मैत्रिणीच्या (शालूच्या) भूमिकेत तिच्या सख्ख्या ताईने काम केले आहे. अभिनेता ओम भूतकरने रावची भूमिका साकारली आहे. अभिनेता अशोक समर्थने सरनोबत प्रतापराव गुजरची भूमिका साकारली आहे. मोनालिसा प्रेक्षकांची ऋणी आहे. कारण, प्रेक्षक त्यांचा मौल्यवान वेळ, पैसा आपल्यासाठी खर्च करतात, याची जाणीव तिला आहे. मायबाप प्रेक्षकांसाठी आपण चांगलं काम केलं पाहिजे, चांगलं पात्र साकारायला हवं, उत्तम अभिनय केला पाहिजे, असा दृढ विश्वास तिला आहे. रंभाच्या भूमिकेसाठी तिने शंभर टक्के काम केले आहे, असे ती मानते.