Tuesday, December 3, 2024
Homeताज्या घडामोडीकोल्हापूर जिल्ह्यातील बालिंगा येथे ज्वेलर्सवर दरोडा

कोल्हापूर जिल्ह्यातील बालिंगा येथे ज्वेलर्सवर दरोडा

दोन दिवसांनंतरही दरोडेखोरांचा पत्ता नाही

बालिंगा : कोल्हापूर जिल्ह्यातील बालिंगा येथे बस स्टॉपजवळ असलेल्या कात्यायनी ज्वेलर्स दुकानावर भरदिवसा दरोडा पडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी, ८ जूनला दुपारी दोन ते सव्वादोन या वेळेत घडली. यात दरोडेखोरांनी ३ किलो सोन्याचे दागिने आणि दीड लाखांची रोकड असा तब्बल १ कोटी ८५ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या दरोडेखोरांची काही दृश्ये सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहेत. यात ते सिनेमा स्टाईलने बंदुकीचा धाक दाखवत दागिन्यांची पिशवी घेऊन बाईकवरुन जात असल्याचे दिसले आहे. मात्र या घटनेला दोन दिवस उलटून गेल्यानंतरही या दरोडेखोरांना पकडण्यात तपास यंत्रणेला यश आलेले नाही.

बंदुकीचा धाक दाखवून लूटमार

गुरुवारी दुकान मालक रमेश माळी, त्यांचा मेहुणा जितू आणि मुलगा पियुष हे तिघे दुकानात होते. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दोन व्यक्ती दुकानात आल्या. यातील एकाच्या डोक्यावर हेल्मेट होते तर दुसऱ्याने रुमालाने आपला चेहरा झाकला होता. बंदुकीचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लूटमार केली. यात दुकानदाराने विरोध दर्शवल्यानंतर गोळीबारही करण्यात आला. दुकानदारासह त्याचा एक सहकारी यात गंभीर जखमी झाला आहे. दुकानाबाहेर जमलेल्या जमावावरही दरोडेखोरांनी गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे.

आसपासच्या दुकानांमधील नागरिकांनी तातडीने याची माहिती करवीर पोलिसांना देऊन जखमींना उपचारासाठी राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. दोघांचीही प्रकृती गंभीर आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या दोन पथकांकडून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे.

मुलगा लपून बसल्याने चांदी आणि रोकड सुरक्षित

दरोडेखोरांनी झटापट करताच दुकानातील भेदरलेला मुलगा पीयूष हा कोपऱ्यातील स्ट्राँगरूममध्ये जाऊन लपला. दरोडेखोर दुकानाबाहेर पडल्यानंतरच तो खोलीतून बाहेर आल्याने त्याला कोणतीही इजा झाली नाही. तसेच स्ट्राँगरूममधील चांदी आणि रोकड सुरक्षित राहिली. मात्र, या घटनेने तो प्रचंड घाबरला होता. त्यानेच घटनेची सर्व माहिती पोलिस अधिकाऱ्यांना सांगितली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -