मूर्तीची विटंबना केल्याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
धुळे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी धार्मिक वाद उसळत आहेत. दंगली, हाणामारीचे प्रकार वाढून राज्यात ताणतणाव निर्माण झाला आहे. त्यातच बुधवारी धुळे शहरातील मोगलाई परिसरात एका धार्मिक स्थळातील मूर्तीची विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी धुळ्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होऊन आज मोर्चाचे आयोजन केले आहे.
मूर्तीची विटंबना झाल्यामुळे रामाची नवीन मूर्ती मंदिरात स्थापन करण्यात येणार आहे. या मूर्तीची पूजा पार पडली असून या मोर्चाद्वारे मूर्ती आगरा रोडवरील श्रीराम मंदिरापर्यंत नेली जाईल. या मोर्चाला कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद असून कार्यकर्ते भगव्या टोप्या व भगवे झेंडे घेऊन मोर्चात दाखल झाले आहेत. या मोर्चामध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल अशा विविध संघटनादेखील सहभागी झाल्या आहेत. तसेच खासदार सुभाष भामरे, महापौर प्रतिभा चौधरी, माजी आमदार राजवर्धन कदमपाटील, माजी महापौर जयश्री अहिरराव, भारतीय जनता पार्टीचे महानगरप्रमुख अनुप अग्रवाल, प्रदीप करपे हेदेखील यात सहभागी झाले आहेत.
धुळ्यात कोणतीही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेत पोलिसांनी मोर्चाच्या मार्गावर कडेकोट बंदोबस्त केला आहे. जवळपास ४५० अधिकारी व २०हून अधिक पोलीस कर्मचारी मोर्चाच्या मार्गावर तैनात असणार आहेत. पोलीसांनी कार्यकर्त्यांना शांताता राखण्याचे आवाहन केले आहे.
मोर्चा मंदिरात पोहोचल्यानंतर त्याठिकाणी महाआरती होणार आहे. त्यानंतर हा मोर्चा शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या शिवतीर्थ चौक येथे पोहोचणार आहे व त्या ठिकाणी मोर्चाचा समारोप केला जाणार आहे.