Sunday, April 20, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्सआंगडियांच्या नावावर ‘तोतयागिरी’

आंगडियांच्या नावावर ‘तोतयागिरी’

महेश पांचाळ : गोलमाल

आधी ‘आंगडिया’ म्हणजे काय? हे साध्या सोप्या भाषेत समजून घेऊ. आंगडिया म्हणजे खासगी कुरियर म्हणता येईल. सोन्या-चांदीचा व्यापार करणारे व्यापारी आपल्या पैशांचे व्यवहार करण्यासाठी या आंगडियाचा सर्रास वापर करतात. या खासगी कुरियर सर्व्हिसच्या माध्यमातून आंगडियांची लाखो रुपये कमाई होत असते. एक लाख रुपये पोहोचविण्याच्या मोबदल्यात आंगडिया साधारणत: २०० ते ८०० रुपये कमिशन मिळवितात, ही बाजारातील ढोबळ माहिती आहे. एवढेच काय तर हिरे व्यापारी एक लाख कोटी, तर सोने-चांदीचे व्यापारी ७० हजार कोटी रुपयांचे व्यवहार या आंगडियांमार्फत करत असल्याने आंगडिया ही पक्की विश्वासपात्र व्यक्ती मानली जाते. मुंबई शहराबरोबर एमआरडीए क्षेत्रात आंगडियांचे जाळे आहे. आंगडिया म्हणजे विश्वासाने व्यवहार करणारी व्यक्ती वाटत असल्याने डोळे बंद करून आंगडियाच्या भरवशावर कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण केली जाते.

गेली अनेक वर्षे आंगडियांमार्फतचा हा व्यवहार सुरळीत सुरू असला तरी हे आंगडिया अनेकदा पोलिसांच्या रडारवर आले आहेत. पैशांच्या हव्यासापोटी हे आंगडिया कधी हवाला ऑपरेटर बनल्याचे काही घटनांवरून पुढे आले, तर काही व्यापाऱ्यांनी कर चुकविण्यासाठी आंगडियांचा आधार घेतल्याचे दिसून आले आहे. अंडरवर्ल्ड आणि दहशतवादी संघटनांनीही आंगडियाचा वापर केल्याची बाब लपून राहिलेली नाही. या आधी मुंबई पोलिसांनी आयपीएल सट्टेबाजी प्रकरणात अल्पेश पटेल या आंगडियाला अटक केली होती. सट्टेबाज रमेश व्यास हा अल्पेश पटेलच्या माध्यमातून परदेशात कोट्यवधी रुपये पाठवत होता. तसेच मुंबई सेंट्रल येथून आंगडियांच्या ट्रकमधून कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले आहेत. हा पैसा दहशतवादी कृत्यांसाठी पाठवला जात असल्याची माहिती असल्यानेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापा घातला होता.

दक्षिण मुंबईतील इमिटेशन ज्वेलरी कंपनीला ७६.५० लाख रुपयांना चुना लावल्याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी तीन जणांना नुकतीच अटक केली आहे. आंगडिया असल्याचे भासवून ही फसवणूक करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने तोतया आंगडियाही बाजारात कार्यरत असल्याचे दिसून आले आहे.

इंद्र चौहान (वय २४) , भैरवसिंग जोधा ( वय २६), कथित सूत्रधार नरेंद्र सोलंकी (वय २२ )अशा तीन तोतया आंगडियांना पायधुनी पोलिसांना भाईंदर, मालाड आणि मीरा रोड या ठिकाणांवरून मोठ्या शिताफीने अटक करण्यात मुंबईतील पायधुनी पोलिसांना यश आले आहे. गेल्या महिन्यात दक्षिण मुंबईतील इमिटेशन ज्वेलरी कंपनीला ७५ लाख रुपये हैदराबाद येथे पाठवायचे होते. कंपनीच्या कर्मचाऱ्याने नियमित आंगडिया असलेल्या व्यक्तीला २५ मे रोजी संपर्क केला होता; परंतु त्याने आपण भारताबाहेर असल्याने हे कुरियर स्वीकारू नसल्याचे कारण सांगितले. त्यानंतर कंपनीचा कर्मचारी मोहम्मद कपाडिया याने दुसऱ्या आंगडियाचा शोध घेतला. त्यावेळी त्याचा अंकित पटेल या व्यक्तीबरोबर संवाद झाला. आपण हे काम करू, असा दावाही त्याने केला. पटेल याच्यावर विश्वास बसल्याने कंपनीच्या मालकालाही पटेलच्या माध्यमातून पैसे हैदराबादला पोहोचवायला हरकत नसल्याचे कपाडियाने सांगितले. कपाडियाने त्याच्या हस्तांतरण शुल्कासह ७६.५० लाख रुपये रोख पटेल याने सांगितलेल्या व्यक्तीकडे दिले. पैसे दिल्यानंतर पटेल यांनी कपाडिया हे नियमितपणे व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते; परंतु ३० मे रोजी कपाडियाला हैदराबाद येथून फोन आला. ज्या हैदराबाद येथील कंपनीकडे पैसे पाठविण्यात आले होते. त्यांना कुरियर मिळाले नसल्याचे समजताच कापडिया गर्भगळीत झाला. त्यानंतर कपाडियाने अंकित पटेलला सातत्याने फोन केले; परंतु त्याने ते फोन उचलले नाहीत. त्याचा फोन बंद असल्याचे दिसून आल्यानंतर कपाडियाने कंपनीच्या मालकाला माहिती दिली आणि पायधुनी पोलीस ठाण्यात फसवणूक आणि विश्वासघाताच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

इमिटेशन ज्वेलरी कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. त्याआधारे रोख रक्कम गोळा करणारा इंद्र चौहान याला भाईंदर येथून अटक करण्यात आली. इंद्र चौहान याचा सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला चेहरा ही एवढीच माहिती हाती असताना त्याची ओळख पटण्यासाठी तसेच त्याला शोधण्यासाठी पायधुनी पोलिसांनी अनेकांना ओळख परेडसाठी बोलावले होते. इंद्रला अटक केल्यानंतर त्याचा साथीदार भैरवसिंग जोधापर्यंत पोलीस पोहोचले. ज्याच्या सूचनेनुसार या गुन्ह्यात सहभाग घेतला, तो या गुन्ह्याचा सूत्रधार नरेंद्र सोलंकीला पोलिसांनी मीरा रोड येथून अटक केली. कपाडिया याच्याशी संपर्कात असलेला अंकित पटेल कोण याचा पोलिसांनी शोध घेतला. त्यावेळी नरेंद्र सोलंकी यानेच अंकित पटेल हे नाव बदलून कपाडियाशी संपर्क केला होता, अशी माहिती तपासात उघड झाली. या तीन आरोपींकडून आतापर्यंत ६५ लाख रुपये जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही रक्कम राजस्थानमध्ये एका नातेवाइकाच्या ठिकाणी लपवून ठेवली होती. आंगडियांच्या नावाखाली तोतयेगिरी होते, ही नवी माहिती आता उजेडात आली आहे.

तात्पर्य : अत्यंत विश्वासाच्या बळावर चालणारा आंगडियांचा व्यवसाय. या व्यवसायातील माणसे कोण आहेत? हे त्या संबंधित उद्योगाशी निगडित व्यक्तींना माहीत असून फसगत होते, तेव्हा ‘तो विश्वास क्या काम की चीज है’, असे म्हणण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -