फेमाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई, ५५५१ कोटींची मालमत्ता जप्त
नवी दिल्ली : ईडीच्या निर्णायक प्राधिकरणाने शाओमी टेक्नॉलॉजी (Xiaomi Technology) या चीनच्या कंपनीसह सीटी बँक (CITI Bank), एचएसबीसी बँक (HSBC Bank) आणि डच बँक एजीला (Dutch Bank AG) कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. याआधी शाओमी कंपनीवर ईडीने फेमा अंतर्गत कारवाई करत तब्बल ५ हजार ५५१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त मालमत्तेची कारवाई ईडीच्या निर्णायक प्राधिकरणाने योग्य असल्याचे म्हटले आहे.
शाओमी टेक्नॉलॉजी कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक मनुकुमार जैन आणि कंपनीचे विद्यमान संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी समीर बी राव यांच्यासह कंपनीला आणि सीटी बँक, एचएसबीसी बँक आणि डच बॅंक एजीला फेमाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने फेमाच्या कलम १० (४) आणि १० (५) चे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे.
परदेशात कंपनीकडून रॉयल्टीच्या रुपाने पैसे पाठवण्याची परवानगी देण्यात आली तसेच तडजोड केल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.