देहू: आषाढीवारीसाठी देहूनगरी सज्ज झाली असून आज तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. हा प्रस्थान सोहळा याची देही याची डोळा पहाण्यासाठी हजारो वारकरी देहूनगरीत जमले असून टाळ मृदंगाच्या गजराने अवघी देहूनगरी दुमदुमली आहे. विठू नामाचा जयघोष करत आज संत तुकाराम महाराजांची पालखी विठ्ठलाच्या भेटीला निघणार आहे.
पंढरीच्या भेटीची आस लागून असणाऱ्या आषाढीवारीला आजपासून सुरुवात होत आहे. यंदा पालखी सोहळ्याचे ३३८ वे वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर देहुत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज सकाळी पहाटे ५ वाजता ‘श्री’ची, संत तुकाराम शिळा मंदिर, श्री विठ्ठल-रखुमाई यांची महापूजा करण्यात आली. त्यानंतर पहाटे ५.३० वाजता तपोनिधी नारायण महाराज समाधी महापूजा करण्यात आली.
हे पण वाचा : वारीला जाताय? संत पालख्यांचे पंढरपूरपर्यंतचे वेळापत्रक जाणून घ्या!
९ ते १० दरम्यान, इनामदार वाडा येथे श्री संत तुकाराम महाराज पादुका पूजन झाल्यानंतर सकाळी १० ते १२ वाजता पालखी प्रस्थान सोहळा आणि काला कीर्तनाला सुरुवात होणार आहे.
दुपारी २ वाजता पालखी प्रस्थान सोहळा सुरू होणार असून यावेळी अश्व व दिंड्यांचे देउळवाड्यात आगमन होणार आहे. दरम्यान, विविध धार्मिक कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आले आहेत.
सायंकाळी ५ वाजता पालखी प्रदक्षिणा होऊन सायंकाळी ६.३० वाजता पालखी सोहळा मुक्काम हा इनामदार वाडा येथे होणार आहे. यानंतर मुख्य आरती होणार असून रात्री ९ वाजता कीर्तन, जागर असे कार्यक्रम होणार आहे. सोमवारी या पालखीचे पुण्यात आगमन होणार आहे.