Sunday, September 14, 2025

अजित पवारांनी ट्विट करत नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे केले अभिनंदन

अजित पवारांनी ट्विट करत नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे केले अभिनंदन
 

अजित पवारांना देश पातळीवर एकही जबाबदारी नाही

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आज पार पडलेल्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या कार्यकारी अध्यक्षपदाच्या नेमणुकीवर अजित पवारांनी 'नो कमेंट्स' अशी भूमिका घेतली होती. सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांच्या नेमणुकीवर अजित पवारांनी माध्यमांसमोर बोलणे टाळले. मात्र आता ट्विट करत त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आज पार पडलेल्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यामध्ये अजित पवार यांना देश पातळीवर कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. मात्र विधानसभा विरोधी पक्षनेत्याचे मोठे पद राज्य पातळीवर त्यांच्याकडे आहे. अजित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये 'पवार साहेबांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली हृदयात महाराष्ट्र व नजरेसमोर राष्ट्र हा विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडणघडणीत मोलाचं योगदान देईल' असं म्हटलं आहे. अजित पवार यांनी आधी 'नो कमेंट्स' असे म्हणत नंतर ट्विटरवर शुभेच्छा दिल्या त्यामुळे अजित पवार आधी नाराज होते का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. तसेच राष्ट्रवादीत काही आलबेल नाही अन् अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे ही स्पर्धा आहेच हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

Comments
Add Comment