मंगलमय वातावरणात तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरला प्रस्थान
पूणे: मुखात विठू माऊलीचे नाव, ग्यानबा तुकारामचा जयघोष, पांढरीशुभ्र बाराबंदी, गळ्यात तुळशीच्या माळा, भाळी टिळा, हातात वीणा अशा मंगलमय वातावरणात देहूनगरीमध्ये तुकोबांच्या पालखी प्रस्थानाचा सोहळा उत्साही आणि भक्तिमय वातावरणात सुरू आहे.
तुकोबांच्या पालखीच्या प्रस्थानाचा प्रारंभ आज देहू येथे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा उद्या आळंदीतून प्रस्थान होणार आहे. त्यासाठी लाखो भाविक अलंकापुरीत दाखल झालेत.
श्रीक्षेत्र देहू संस्थान कमिटीच्या वतीने आज पहाटे पाच वाजल्यापासून शिळा मंदिर, तुकोबांचे मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज महापूजा झाली. परंपरेनुसार तपोनिधी नारायण महाराजांच्या पूजनानंतर काल्याचे कीर्तन झाले. दुपारी बारानंतर महाप्रसाद आणि महानैवेद्य दाखविल्यानंतर पालखी प्रस्थान सोहळ्याची सुरुवात झाली.
Ashadhi Ekadashi 2023: वारीला जाताय? मग संत पालख्यांचे पंढरपूरपर्यंतचे वेळापत्रक जाणून घ्या!
तुकोबांच्या पादुका वाजत गाजत मिरवत शिळा मंदिरात आणण्यात आल्या. मंदिरात पादुकांची महापूजा झाली. त्यानंतर मान्यवर अतिथी, विश्वस्त, संस्थानचे पदाधिकारी, मानकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत तुकोबांचा पालखी प्रस्थान सोहळा सुरू झाला. मानकरी आणि सेवेकऱ्यांनी तुकोबांच्या पादुका मस्तकी धारण करून मंदिर प्रदक्षिणा केली. त्यानंतर कीर्तनसेवा होऊन, अभंगांच्या गजरात दर्शनबारीला सुरुवात झाली.
तुकोबांची पालखी आज रात्री आजोळघरी
प्रस्थान सोहळ्यानंतर तुकोबांच्या पादुका पालखीत विराजमान करून नगर प्रदक्षिणा होईल आणि त्यानंतर तुकोबांचा पालखी सोहळा रात्रीच्या पहिल्या मुक्कामासाठी आपल्या आजोळघरी म्हणजे देहूनगरीतील इनामदार वाड्यात विश्रांती घेईल. रविवारी पहाटे लक्षावधी वारकऱ्यांच्या साथीने हा पालखी सोहळा आकुर्डीच्या दिशेने मार्गस्थ होईल.