मनातले कवडसे : रूपाली हिर्लेकर
नवीन शैक्षणिक वर्षाची सूचना मिळताच मधल्या सुट्टीत विद्यार्थ्यांच्या चर्चेला सुरुवात झाली. मी त्यांच्या गप्पा ऐकत होते. त्यांच्यापैकी बहुतेकांनी ऑनलाइन रेनकोट, छत्री, बॅग, वॉटर बॉटल, गम बूट वगैरे बुक केलेले होते. एक मुलगी म्हणाली, “मी तर यावर्षी डिजिटल कंपास बॉक्स ऑनलाइन मागवली आहे.”
तास संपल्यावर मी स्टाफ रूममध्ये येऊन बसले. मगाशी विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शॉपिंगबद्दल विचार करता करता मला माझे बालपणीचे दिवस आठवले. मे महिन्याच्या मोठ्या सुट्टीनंतर १३ जूनला दरवर्षी शाळा सुरू व्हायची. मी १ जून पासूनच शाळेच्या तयारीला लागत असे. बाबांच्या मागे मी सारखा “मला नवीन वह्या – पुस्तकं घ्या”, असा धोशा लावायची. बाबाही माझा हट्ट लागलीच पुरवत. तशी आमच्या शेजारच्या ताईकडून मी दरवर्षी काही जुनी पुस्तकंही घेत असे. कारण ती माझ्यापेक्षा एक वर्ष पुढे होती. ताई अत्यंत टापटीप व व्यवस्थित असल्याने तिची पुस्तकं अगदी नवीन असल्यासारखी दिसायची. प्रत्येक पुस्तकाला ती छान कव्हर घालायची. त्यावर चिकटवलेल्या लेबलावर सुंदर अक्षरात तिने स्वतःचं नाव कोरून लिहिलेलं असायचं. पुस्तकात कुठेही कसल्या खाणाखुणा, पान मुडपलेलं वा फाटलेलं नसे. त्यामुळे पुस्तकं तर ताईकडून मला सुट्टीत आधीच मिळून जात. मात्र काही नवीन पुस्तकं, वह्या, पेन्सिली, गणवेश हे सारं मला नव्याने घ्यावं लागे. ते आणायला मी व बाबा नेहमीच्या ठरावीक दुकानात जात असू. त्या दुकानात दरवर्षी पुस्तकं घ्यायला भरपूर गर्दी असे. मी त्या गर्दीत आत शिरून माझ्या वह्या, पुस्तकं, पेन्सिली, रंगांचे बॉक्स निवडून घेई. बाबांनी आधीच ऑर्डर दिलेली असायची. बिल करून बाबांनी पैसे दिल्यावर मी मोठ्या ऐटीत वह्या-पुस्तकांची पिशवी घेऊन बाहेर पडे. मग रस्त्यात आम्ही त्या पुस्तकांबद्दल बोलत बोलत घरी पोहोचल्यानंतरही तोच विषय सतत डोक्यात घोळत असे.
“बाबा, यंदा किनई आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. खूप छान आहे. मला इतिहासात पैकीच्या पैकी मिळणार…”
“आणि गणिताचं काय?” बाबा मिश्कीलपणे विचारत.
“ऊंsss गणित विषय, तर फारच अवघड आहे
बाबा यंदा…”
“असं होय? मागच्या वर्षी पण तू हेच बोलली होतीस ना?” बाबा हसून विचारत आणि म्हणत, “हे बघ नीट अभ्यास केला ना, तर अवघड काहीच नसतं बेटा.” त्यावर खूप काही समजल्यासारखं मी मान डोलवी. पण प्रत्यक्षात तसा गणिताचा मला कायम कंटाळाच वाटे.
घरी आल्यावर मी बराच वेळ नवीन वह्या-पुस्तकांचा नुसता वास घेत बसायची. तो गंध इतका छान भासायचा की सारखा सारखा तोच घ्यावासा वाटे. आई दटावून म्हणायची, “अगं बस् झालं की आता. ती पुस्तकं खाणार आहेस की काय?” हे ऐकल्यावर मला हसू येई. मग त्याच दिवशी नव्या पुस्तकांना कव्हर घालण्याचा कार्यक्रम होई. माझ्या व लहान भावाच्या पुस्तकांना कव्हर घालण्याचं काम माझ्याकडे असे.
शाळेच्या गणवेशाची खरेदी हा आणखी एक मोठा कार्यक्रम असायचा. आजच्यासारखे तेव्हा रोज वेगळे युनिफॉर्म असं काही नव्हतं. आम्हाला दोनच युनिफाॅर्म मिळायचे – एक रोजसाठीचा आणि एक स्पोर्ट्ससाठी पांढरा. रोजचे गणवेशही आलटून-पालटून धुवून, सुकवून घालावे लागत.
हल्ली दरवर्षी नवीन नवीन रेनकोट, छत्र्या घेतल्या जातात. आम्हाला एकच एक छत्री ३-४ वर्षे तरी दुरुस्त करून पुरवावी लागे. आमचे लाड होत नव्हते असं नाही. पण मुळात आवाजवी मागण्या तेव्हा होत नसत. आज मुलांना दरवर्षी नवनवीन कंपास बॉक्स, वेगवेगळ्या प्रकारचे शूज, सॉक्स घेतले जातात. सर्व काही फॅशननुसार, ट्रेंडी लागतं आणि तेही सतत बदलत राहातं. तेव्हा गरजा माफक होत्या आणि आई-बाबा काय सांगतील त्याप्रमाणे मुलं ऐकत आणि तशी वागतही असत. पण आज मुलांच्या मागण्या ग्लोबल झालेल्या आहेत व पालकांनाही त्या पूर्ण करण्यात धन्यता वाटते. आताचे आई-बाबा स्वतःच खूप बिझी असल्याने मुलांच्या मागण्यांबद्दलची शहानिशा करण्यासाठीही वेळ त्यांच्यापाशी नसतो. मुलांसोबत जाऊन प्रत्यक्ष खरेदी करण्यापेक्षा ऑनलाइन शॉपिंग सोयीचं आणि स्टेटस सिंबाॅलही झालेलं आहे. मात्र यामध्ये आपण वस्तूंशी निगडित असलेली आपुलकी-प्रेम हरवत चाललो आहोत. माणसांप्रमाणेच वस्तूंशीही एक प्रेमाचं नातं असतं, आपुलकी असते, याची जाणीवच मुलं हरवून बसली आहेत.
माझी ऑक्सफर्ड डिक्शनरी, जी माझ्या बाबांनी मला आठवीला असताना आणली होती आणि त्यातून शब्दांचे अर्थ कसे शोधायचे हेही शिकवलं होतं, ती अजूनही माझ्याजवळ आहे. असंख्य शब्दांचे अर्थ मला त्यातूनच उमगले. आजही ती डिक्शनरी हाताळताना मला जणू बाबाच त्या शब्दाचा अर्थ समजावून सांगत आहेत, असं वाटतं. पण आता मोबाइलवर ऑनलाइन सर्व शब्दांचे अर्थ सहज मिळत असल्यामुळे डिक्शनरीची गरज वाटत नाही. एकंदरीत ऑनलाइन शॉपिंगच्या नादाने आपण वस्तूंच्या आठवणी, त्यांची ओढ आणि त्यासोबत जोडलेल्या व्यक्तींच्या आपुलकीच्या स्पर्शाप्रति ऑफलाइन होत चाललेलो आहोत, या वास्तवाची जाणीव शाळेतील मुलांच्या संवादातून मला प्रकर्षाने झाली. एवढ्यात तास संपल्याची बेल वाजली आणि मी पुढील तासासाठी लगबगीने वर्गाच्या दिशेने चालू लागले.