
अवघ्या जगाला अहिंसेची शिकवण देणारे महात्मा गांधी, त्यांचे शिष्य विनोबा भावे यांच्याबरोबरच महात्मा जोतिबा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अनेक संत - महात्म्यांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला झालेय तरी काय? असा प्रश्न पडावा अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. महाराष्ट्राची पुरोगामी, सहिष्णू, आधुनिकतेचा आचार - विचार देणारे राज्य ही ओळख पुसली जाते की काय, असा प्रश्न पडण्यासारखी भीतिदायक परिस्थिती सध्या दिसत आहे. सदैव शांत असलेले हे राज्य गेले काही दिवस अप्रिय अशा घटनांनी काळवंडले गेले आहे. आधी संभाजीनगर, नंतर अकोला आणि शेवगावात झालेल्या हिंसाचाराच्या घटनांनी वातावरण तंग असतानाच नंतर संगमनेरमध्ये दोन गटांत तुफान राडा झाल्याची खळबळजनक घटना घडली. त्यानंतर आता औरंगजेब, टिपू सुल्तान यांचा संदर्भ देऊन सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी कोल्हापुरात तणाव निर्माण झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशीच सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या घटनेनंतर कोल्हापुरात मोठा हिंसाचार झाला. समाजकंटकांनी वादग्रस्त पोस्ट शेयर केल्यानंतर त्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला. शहरातील मुख्य चौकात हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन करत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली व पोलीस स्टेशन समोर आंदोलन केले. त्यानंतर शहरात काही ठिकाणी दगडफेक झाली. शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत असलेल्या गंजी गल्ली, महाद्वार रोड, अकबर मोहल्ला, महापालिकेचा भाग आणि शिवाजी रोड या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. त्याचबरोबर शहरात गोंधळ घालून वातावरण खराब करणाऱ्या आरोपींना पोलिसांकडून भररस्त्यात चोप दिला गेला. एकूण परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाकडून जमावबंदी आदेश लागू करण्यात आला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थिती नियंत्रणात आणली. शिवाय शहरातील अनेक ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच येत्या १९ जूनपर्यंत पोलिसांनी शहरात प्रवेशबंदी लागू केली आहे. जिल्हा प्रशासनाने कोल्हापूरमध्ये सोशल मीडियामधून कुठल्याही प्रकारचे आक्षेपार्ह मेसेज व्हायरल होऊ नयेत यासाठी मोबाइल इंटरनेट सेवा खंडित करण्याचे आदेश दिले आहेत. कोल्हापुरातील संवेदनशील भागात इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली आहे.
खरं म्हणजे जमाव प्रक्षुब्ध का झाला, यावर सर्वांत आधी विचार केला गेला पाहिजे. एकाएकी जमाव प्रक्षुब्ध होत नाही. औरंगजेबाचे फोटो डोक्यावर घेऊन समाजकंटकांनी काही दिवसांपूर्वी संभाजीनगरमध्ये मिरवणूक काढली. क्रुरकर्मा औरंगजेबाने चाळीस दिवस अतोनात छळ करत संभाजी महाराजांचा जीव घेतला. अशा दुष्ट औरंगजेबाचे फोटो घेऊन कोणी नाचत असेल, तर जमाव प्रक्षुब्ध होणारच. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांनी चालणाऱ्या महाराष्ट्रात अशा समाजविघातक घटना कोण घडवितो? याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. तसेच हे करणारे लोक कोण आहेत? डोक्यावर फोटो घेऊन नाचवणाऱ्यांच्या मागे कोणती शक्ती आहे? या घटनांच्या पडद्यामागचे सूत्रधार नेमके कोण आहेत, याचा शोध घेतला गेला पाहिजे. फोटो डोक्यावर घेऊन नाचणारे आणि त्यांना नाचविणारे जे कोणी आहेत त्यांना सायबर सेलमार्फत हुडकून काढून त्यांची चौकशी झाली पाहिजे. वेळप्रसंगी राज्याच्या गुप्तचर खात्याकडून त्यांची कसून चौकशी झाली पाहिजे. या सर्व राड्याचा विचार करता ज्यांच्या मोबाइलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आला त्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पण हे सर्वजण अल्पवयीन आहेत. ही बाब ध्यानी घेता, अशा घटनेमागे विशिष्ट विचारसरणीचे लोक किंवा एखादा गट कार्यरत असावा अशी शंका वाटण्यास वाव आहे. कारण आल्पवयीन मुलांचा वापर केल्यास या घटनेचे गांभीर्य काहीसे कमी होईल आणि अल्पवयीन असल्याने त्यांना होणारी शिक्षाही कमी असेल. तसेच मुख्य सूत्रधार मात्र या सर्व चौकशीपासून सहिसलामत दूर राहतील हा उद्दश त्यामागे असावा हे नक्की. लोकांनीही सोशल मीडियावरील एकाद्या पोस्टमुळे भावनाविवश होणे टाळले पाहिजे व अफवांनाही बळी पडू नये. अनावश्यक घराबाहेर पडून गर्दी करू नये. कारण याचाच गैरफायदा घेऊन लोकांना घाबरवणाऱ्या व दंगा घडवून आणणाऱ्या गुंडांचे फावते आणि आपले इप्सित साधण्यात ते यशस्वी होतात.
कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच सर्वधर्मसमभावाचा पुरस्कर्ता आणि प्रगतशील जिल्हा राहिला आहे. शाहू महाराजांचे कार्य कर्तृत्व आणि त्यांच्या विचारसरणीतून प्रेरणा घेऊन आजवर कोल्हापूर जिल्ह्याने पुरोगामी आणि आधुनिकतेचा विचार दिला आहे. कोल्हापूरचा आणि महाराष्ट्राचा सामाजिक क्षेत्रातील हा ठसा कायम राखण्यासाठी दंगली घडविणाऱ्यांचा आणि सूत्रधारांचा पुरता बिमोड केला गेला पाहिजे. महाराष्ट्रात सध्या शांततेचे वातावरण आहे. विकासाची कामे जारात सुरू आहेत. त्याला खिळ बसवण्यासाठी किंवा गालबोट लावण्यासाठी जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न कोणी करतेय का याच्या खोलवर जाणे गरजेचे आहे. औरंगजेबाचे फोटो स्टेटसला ठेवून जर कोणी सामाजिक सलोखा बिघडवू पाहत असेल, तर अशा शक्तींना ठेचून काढणे हा एकमेव उपाय उरतो.