‘बिपरजॉय’ चक्रीवादळाने उडवली हवामान विभागाच्या अधिका-यांची झोप!
पुणे : केरळमध्ये दाखल झालेला मान्सून आता महाराष्ट्रात कधी दाखल होणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. केरळमध्ये पाऊस पोहोचला असला तरी मुंबईसह राज्यातील काही भागांत अजूनही उन्हाचा फटका बसत आहे. मान्सून साधारणपणे १ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो आणि १० जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होतो. पण, आता केरळमध्ये पाऊस उशिरा आल्याने राज्यातील पाऊसही लांबला आहे. त्यातच ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ येत्या ४८ तासांत आणखी तीव्र होण्याचा अंदाज असल्याने या चक्रीवादळाने हवामान विभागाच्या अधिका-यांची झोप उडवली आहे.
प्रादेशिक हवामान केंद्राचे मुंबई प्रमुख एस. जी. कांबळे यांनी सांगितले की, “महाराष्ट्रात १० जून आणि मुंबईत ११ जून ही मान्सून सुरू होण्याची सामान्य तारीख आहे. मान्सून केरळमध्ये उशीराने पोहोचला आहे. त्यातच ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ घोंगावते आहे. यामुळे हे चक्रीवादळ आणि मान्सूनच्या प्रगतीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. येत्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्रात मान्सूनच्या सुरुवातीबाबत माहिती मिळेल.”
साधारणपणे १ जनपर्यंत केरळमध्ये दाखल होणाऱ्या पाऊस ८ जूनला केरळमध्ये पोहोचला. या पार्श्वभूमीवर १८ जूनपर्यंत महाराष्ट्रात पाऊस येण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामध्ये दोन ते तीन दिवसांचा फरक जाणवू शकतो.
स्कायमेट वेदरनुसार, पुढील तीन ते चार दिवस खूप तीव्र चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे.