बारामती: महाराष्ट्र प्रीमियर लीग अर्थात एमपीएलची लिलावप्रक्रिया नुकतीच पार पडली. सहा संघात अनेक खेळाडूंना करारबद्ध करण्यात आले. अशातच महाराष्ट्र क्रिकेटला हादरवणारी बातमी समोर आली आहे. वय लपवल्याच्या आरोपाखाली युवा क्रिकेटपटूला बारामतीत अटक करण्यात आलेय. अमोल कोळपे असे त्याचे नाव आहे. जानेवारी महिन्यात एमसीएतर्फे आयोजित केलेल्या अंडर १९ स्पर्धेत अमोल याने वय लपवल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. २५ वय असताना १९ दाखवले होते, त्यामुळे बारामती पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. बारामती पोलिसांनी शहनिशा केल्यानंतर अटकेची कारवाई केली आहे. याप्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
जानेवारी महिन्यामध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने १९ वर्षाखालील वयोगटाच्या पात्रता फेरीचे सामने आयोजित करण्यात आले होते. यामध्ये १९ वर्षाखालील वयोगटाच्या संघात पुण्यातील शिळीमकर स्पोर्ट्स अकादमी या संघाने २५ वर्षीय खेळाडू खेळवला म्हणून बारामतीतील कारभारी जिमखाना क्रिकेट संघाने शिळीमकर क्रिकेट अकॅडमी संघाचा क्रिकेटपटू अमोल कोळपे, संघमालक बारामतीतील दीपक शिळीमकर, प्रशिक्षक प्रशांत तेलंग या तिघांसह पुणे क्रिकेट असोसिएशनचा सहसचिव सुशील शेवाळे या चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
अंडर १९ स्पर्धेत अमोल याने सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये २८ सप्टेंबर २००७ अशी जन्मतारीख आहे. पण अमोलची काही जुनी कागदपत्रे समोर आली. त्यामध्ये त्याची जन्मतारीख १५ फेब्रुवारी १९९९ असल्याचे स्पष्ट झाली. दाखल केलेल्या तक्रारीनंतर अमोल याच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच अन्य तिघांवर फसवणूक व खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.