Sunday, July 14, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यमहिला आणि गुंतवणूक...

महिला आणि गुंतवणूक…

उदय पिंगळे : मुंबई ग्राहक पंचायत

आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला हवे तेव्हा पैसे खर्च करता येणे आणि पैशांसाठी कोणावरही अवलंबून न राहावे लागणे असे ढोबळमानाने म्हणता येईल. त्यानुसार बहुतेक गुंतवणूक निर्णय घेतले जातात. मात्र असे निर्णय हे बहुधा घरातील पुरुष सभासदाकडून घेतले जातात आणि कागदपत्रांवर महिला डोळे मिटून सह्या करतात. त्यात अनेकदा त्यांना ही काय कटकट, असेही वाटत असते. अनेकदा अशी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारासही अगदी जुजबी माहिती असते. खरे ते हे निर्णय एकमेकांच्या मतांचा आदर करून पारदर्शक पद्धतीने घ्यायला हवेत.

मोजकेच गुंतवणूक सल्लागार त्यांचा गुंतवणूक सल्ला घेण्यासाठी जोडीदारासह किंवा अविवाहित गुंतवणूकदारांना त्याच्या आईसह येण्यास सांगतात. योजना समजावून सांगून शंकांचे निराकरण करतात. काही प्रश्नावली भरून घेऊन त्यांची धोका घेण्याची क्षमता आजमावून घेतात. ही एक आदर्श पद्धत आहे. खर तर गुंतवणूक करण्यासाठी लागू असलेले नियम स्त्रिया आणि पुरुष यांच्यासाठी वेगळे नाहीत.

त्यामुळे…
पुरेसा इन्शुरन्स घेणे : आपण घेतलेले कर्ज आणि त्यात आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या २० पट रक्कम मिळवून येणाऱ्या रकमेचा इन्शुरन्स घेणे आवश्यक आहे. असा इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स याच प्रकारात मोडतो. टर्म इन्शुरन्स हा आपण किती वर्षे कार्यरत राहू याचा विचार करून तेवढ्याच कालावधीचा घ्यावा. अन्य कोणत्याही योजना प्रकारातील विमा आपली पूर्ण गरज भागवू शकत नाही. त्याचप्रमाणे प्रीमियम परत मिळणारा बोनस मिळू शकणारा टर्म इन्शुरन्स घेऊ नये कारण त्याचा प्रीमियम अधिक असतो. नियमित प्रीमियम भरून योजना चालू ठेवावी.

पुरेसा आरोग्यविमा घेणे : आपण कुठे राहतो या परिसराचा विचार करून वार्षिक उत्पन्नाच्या ३ ते ५ पट आरोग्यविमा घेता येईल. याचे प्रीमियम आजकाल खूप वाढले असून व्यक्तिगत विमा घेण्याऐवजी कुटुंबाचा एकत्रित विमा घेणे किफायतशीर आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शेअरबाजारातील गुंतवणूक यातून महागाईवर मात करणारा परतावा मिळू शकत असल्याने, आपल्या स्वप्नपूर्तीसाठी लवकरात लवकर गुंतवणूक करण्यास सुरुवात करावी. गुंतवणूक दोन्ही प्रकारात स्वतः अथवा सल्लागाराची मदत घेऊन करता येईल.

 

गुंतवणूक विविध प्रकारात विभागावी : गुंतवणूक विविध मालमत्ता प्रकारात विभागून दीर्घ काळासाठी केल्यास त्यातील धोक्याची तीव्रता कमी होते.

स्थावर मालमत्तेमधील गुंतवणूक : अशी गुंतवणूक हा कदाचित आतबट्याचा व्यवहार ठरू शकतो. त्याऐवजी रिटस आणि इनवीट या आधुनिक पर्यायांचा विचार करावा.
सोन्यातील गुंतवणूक : अशी गुंतवणूक दागिन्यांच्या स्वरूपात न करता शुद्ध स्वरूपात करावी. यासाठी डिजिटल गोल्ड, इजिआर हे आधुनिक पर्याय उपलब्ध आहेत, त्याचप्रमाणे सरकारकडून हमी असलेले सुवर्ण सार्वभौम रोखे हे नियमित उत्पन्न देणारे आणि आयकरात काही सवलती देणारे आहेत त्यांचा अवश्य विचार करता येईल.

याशिवाय पारंपरिक बचतीच्या पर्यायांचा वापर गरजेनुसार करता येईल. या सर्वांना लागू असणाऱ्या प्राथमिक गोष्टी आहेत. यातील एक अथवा अनेक प्रकार एकत्र करून आपले गुंतवणूक घोरण ठरवून वेळोवेळी त्याचा आढावा घेता येईल. किमान ₹ ५० लाख गुंतवणूक करू शकणारे गुंतवणूकदार गुंतवणूक संच व्यवस्थापन करणाऱ्या (पीएमएस) तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन घेऊ शकतात आणि आपली गुंतवणूक अधिक चांगली करू शकतील किंवा स्वतः अभ्यास करूनही गुंतवणूक करू शकतील. यात स्त्री की पुरुष असा कोणताही भेदभाव नाही. फक्त स्त्री म्हणून आपण आपला आणि कुटुंबाचा विचार करून गुंतवणूक करणार असाल तर काही गोष्टी ध्यानात ठेवाव्यात.

 • आपल्या आणि जोडीदाराच्या (जोडीदार असल्यास) उत्पन्नाचा अंदाज घ्या. उत्पन्न आणि जबाबदाऱ्या यांचा विचार करा.
 • विवाहाचा विचार असल्या/नसल्याच्या शक्यतांचा, त्यातून निर्माण होणारे प्रश्न यांचा विचार करा.
 • भारतातील स्त्रियांचे आयुर्मान पुरुषांहून अधिक आहे यादृष्टीने भविष्याचा विचार करा.
 • कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे महिलांचे अनेकदा करिअरकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. यातून काही मानसिक समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
 • जास्त जगण्याची शक्यता म्हणजे निरोगी जगण्याची हमी असे नाही. वयानुसार आजार मागोमाग येतील याचा विचार करा.
 • जितक्या सहजतेने आपण अन्य गोष्टी खरेदी करतो, तपासून पाहतो. दर्जा आणि दर याची तुलना करून कोणती वस्तू सुयोग्य ते ठरवतो त्याचप्रमाणे गुंतवणूक करा.
 • स्त्रिया मनात आणल्यास पुरुषांहून अधिक वेगवेगळ्या शक्यतांचा विचार करू शकतात तेव्हा सर्व दृष्टिकोनातून विचार करा. यासाठी कोणतीही गुंतवणूक नीट पारखावी, त्या संबंधित किरकोळ शंकांचे समाधान करून घ्यावे. जर घरातील एखादी व्यक्ती या विषयात तज्ज्ञ असेल तर त्याच्याशी चर्चा करून, त्याचे मत आजमावून किंवा पूर्ण खात्री असल्यास विश्वास ठेवून निर्णय घ्यावा.
 • ज्ञानातील गुंतवणूक ही सर्वश्रेष्ठ गुंतवणूक : यासंबंधी अधिकाधिक ज्ञान मिळवणे आवश्यक असून त्यासाठी काही रक्कम खर्च करण्याची तयारी ठेवावी.

महिलांचा गुंतवणूक दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी दोन वर्षांपूर्वी ग्रोव्ह या गुंतवणूक पोर्टलमार्फत एक सर्व्हे घेण्यात आला. यात अडीच लाख महिलांना प्रश्नावली पाठवण्यात आली. त्यातील २८००० महिलांनी प्रश्नावली भरून सहभाग घेतला. एवढ्या कमी सहभागातून खात्रीपूर्वक सार्वत्रिक निष्कर्ष काढता येणार नाहीत तरी मिळालेले प्रतिनिधिक निष्कर्ष असे आहेत –

 • गुंतवणूक करणाऱ्या महिलांचे प्रमाण (नोकरी-व्यवसाय करणाऱ्या न करणाऱ्या) वाढत आहे.
 • अनेक महिला स्वतंत्र गुंतवणूक निर्णय घेत आहेत.
 • १८ ते २५ वर्षांच्या आतील महिलांचे शेअरबाजार, म्युच्युअल फंड योजनांत गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढत आहे.
 • सर्वच वयोगटातील महिलांपैकी २५% महिलांना सोन्यातील गुंतवणूक योग्य वाटते. यातील ४०% महिलांचे उत्पन्न १० लाख रुपयांहून अधिक आहे.
 • ₹ ३० लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या महिलांना स्थावर मालमत्तेतील गुंतवणूक करणे महत्त्वाचे वाटते. यातील ६% महिला क्रेप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करीत आहेत.
 • ५०% महिला काही उद्दिष्ट ठेवून गुंतवणूक करीत आहेत. ४३% महिला कुटुंबास मदत म्हणून गुंतवणूक करीत आहेत. ४ मधील १ महिलेचे पर्यटन हेही गुंतवणूक उद्दिष्ट आहे.
 • उद्दिष्टांची तुलना करता जास्त उत्पन्नापासून कमी उत्पन्न मिळवणाऱ्या महिलांचे लवकर सेवानिवृत्ती घेणे हे उद्दिष्ट उतरत्या क्रमाने आहे. अल्प, मध्यम उत्पन्न मिळवणाऱ्या महिलांचे लग्न आणि मुलांचे शिक्षण असे उद्दिष्ट चढत्या क्रमाने आहे. तरुण महिलांचा कल वैयक्तिक उद्दिष्ट, पर्यटन आणि उच्च शिक्षण असा आहे.
 • १० लाखांहून कमी उत्पन्न असणाऱ्या २०% महिला कर वाचावा म्हणून गुंतवणूक करतात.
  गुंतवणूक न करणाऱ्या २००० महिलांपैकी ४९% महिलांना गुंतवणुकीबद्दल काहीच माहिती नाही. ३२% महिलांना त्यांच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी पुरेसे पैसेच नाहीत असं वाटतंय, तर १३% महिलांना शेअरबाजारात गुंतवणूक करून आपले पैसे बुडतील असं वाटतंय. त्यामुळेच या गटातील महिलांची अर्थसाक्षरता वाढणे जरुरीचे आहे. आता ॲपची मदत घेऊन, स्वतः माहिती मिळवून, गुंतवणूक करणे सोपे झाले आहे.

तेव्हा महिलांनो, अर्थसाक्षर व्हा, गुंतवणूक वाढवा, स्वावलंबी व्हा!

mgpshikshan@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -