Sunday, March 23, 2025
Homeमहत्वाची बातमी'यांना' लोकसभेत पाठवण्यासाठी भाजप सज्ज

‘यांना’ लोकसभेत पाठवण्यासाठी भाजप सज्ज

गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, अमित साटम, पराग अळवणी, योगेश सागर, राहुल कुल, धनंजय महाडिक हे भाजपचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार

मुंबई : लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनेमध्ये काही बदल केले असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुख जाहीर केले. प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी भाजप नेत्यांना दिली आहे. या जाहीर झालेल्या लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुखांच्या यादीत भविष्यात निवडणुकीत उमेदवारही असू शकतात नव्हे भाजपने त्यांना उमेदवारी देण्याचीही तयारी केल्याचे दिसत आहे. यात दिग्गज नेत्यांना आणि काही विद्यमान मंत्र्यांना लोकसभेत पाठवण्याची रणनिती जाहीर झालेल्या या निवडणूक प्रमुख यादीवरून लक्षात येते.

यामध्ये मंत्री गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, सरचिटणीस विनोद तावडे, विद्यमान आमदार अमित साटम, पराग अळवणी हे भाजपचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता आहे.

मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघाची जबाबदारी अमित साटम यांच्या खांद्यावर आहे. साटम हे दोन वेळा आमदार आहेत. या मतदारसंघात गजानन किर्तीकर हे खासदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखाची जबाबदारी साटम यांना देताना भाजपने वेगळा विचार केल्याचे दिसते.

उत्तर मुंबई हा भाजपचा सर्वात सुरक्षित मतदारसंघ आहे. या मतदारसंघाचे प्रमुख म्हणून योगेश सागर यांना नियुक्ती दिली आहे. भाजप नेते विनोद तावडे सध्या राष्ट्रीय राजकारणात आहेत. ते भाजपचे राष्ट्रीय महासचिव आहेत. त्यांचेही राजकीय पुनर्वसन करण्याचा भाजपचा विचार आहे.

उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात पराग अळवणी यांच्याकडे जबाबदारी आहे. या मतदारसंघात भाजप नेत्या पूनम महाजन या दोन टर्म खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. या मतदारसंघात ‘अँटी इन्कम्बसीचा’ अंदाज दिसून येत आहे. त्यामुळे पूनम महाजन यांना वेगळी जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

परभणी मतदारसंघात रामप्रसाद बोर्डीकर यांना जबाबदारी दिली आहे. धुळे मतदारसंघाची जबाबदारी राजवर्धन कदमबांडे यांच्याकडे देऊन विद्यमान आमदार सुभाष भामरे यांचा पर्याय पक्षाने डोळ्यासमोर ठेवल्याचे दिसून येत आहे. बुलढाण्यातही विजयराज शिंदे यांच्यासारखा चेहरा प्रमुख म्हणून पुढे आणला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मावळ मतदारसंघात नवीन राजकीय समीकरणे जुळविण्याच्या दृष्टीने प्रशांत ठाकूर यांना भाजपने पुढे आणले आहे.

रावेर लोकसभेसाठी गिरीश महाजन हे असू शकतात उमेदवार त्यांचे अत्यंत विश्वासू असलेल्या राधेश्याम चौधरी यांना मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. यावरून भाजपचे काय इरादे आहेत याचा अंदाज येतो. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी प्रमोद कडू यांच्याकडे देण्यात आली आहे. आता कडू हे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी लोकसभेची जमीन तयार करतील असे दिसते. मात्र, अधिकृत नावांची घोषणा होत नाही तोपर्यंत खरे चित्र स्पष्ट होणार नाही.

सातारा मतदारसंघात अतुल भोसले यांना जबाबदारी मिळाली आहे. माढा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी भाजपने प्रशांत परिचारक यांना दिली आहे. या मतदारसंघाचे रणजित नाईक निंबाळकर हे खासदार आहेत.

नाशिक मतदारसंघात भाजपने केदा आहेर यांना संधी दिली आहे. माजी मंत्री दौलतराव आहेर यांच्या घरात लोकसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अकोला हा मतदारसंघ सातत्याने भाजपकडे राहिला आहे. अशा वेळी या बालेकिल्ल्याची जबाबदारी अनुप धोत्रे यांच्याकडे राहणार आहे. संजय धोत्रे या मतदारसंघात २००४ मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर तीन वेळेस त्यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. मागील दोन वर्षांपासून ते आजारी आहेत. म्हणून आता भाजपने त्यांच्या मुलावर मोठी जबाबदारी सोपविली आहे. आगामी निवडणुकीत अतुल धोत्रे यांना भाजपने तिकीट दिले तर आश्चर्य वाटायला नको.

राज्यात नेहमीच चर्चेत असणारा बारामती मतदारसंघ. यंदा हा मतदारसंघ जिंकायचाच असा भाजपाचा इरादा आहे. या मतदारसंघाची जबाबदारी राहुल कुल यांना देण्यात आली आहे. कुल यांचे येथील राजकीय वजन पाहता तेच लोकसभेचे उमेदवार असतील अशी शक्यता आहे. भंडारा गोंदिया माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांचा मुलगा विजय शिवणकर यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भविष्यात ते लोकसभेचे उमेदवार असतील

या घडामोडी सुरू असतानाच भाजपने आघाडी घेत निवडणूक प्रमुख नेमले आहेत. कदाचित हेच निवडणूक प्रमुख आगामी निवडणुकीत पक्षाचे उमेदवार असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. पुणे लोकसभेची जबाबदारी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर सोपविण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत मोहोळ यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, भाजपने त्यांच्या खांद्यावर ही नवी जबाबदारी दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी भाजप नेते धनंजय महाडिक यांना देण्यात आली आहे. महाडिक यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेतली होती. त्यानंतर आता भाजपने त्यांना थेट मतदारसंघाची जबाबदारीच देण्यात आली आहे. त्यावरून भाजप श्रेष्ठींच्या मनात काय चाललंय याचा अंदाज येतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -