Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीशरद पवार आणि संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

शरद पवार आणि संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

धमकी देणं खपवून घेणार नाही : देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून दंगली घडत असल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. औरंगजेबाचे स्टेटस लावल्याने महाराष्ट्रात काही ठिकाणी वाद झाले. यावर कारवाई होऊनही त्याचे पडसाद अजूनही उमटताना दिसत आहेत. हे वाद आता राजकीय वर्तुळात जाऊन पोहोचले आहेत. राज्यातील नेत्यांना आता धमकी देण्याचं सत्र सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

‘तुझा लवकरच दाभोळकर होणार आहे’; शरद पवारांना धमकी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एका ट्विटर हॅंडलवरुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे वृत्त समोर आले आहे. यात ‘तुझा लवकरच दाभोळकर होणार आहे’ अशा स्वरुपाची धमकी देत घाणेरड्या भाषेत शिवीगाळही करण्यात आली. यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार व शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. तसेच महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था ढासळली असून, अत्यंत घाणेरडं आणि खालच्या पातळीवरचं राजकारण सुरु आहे, यात गृहविभागाने तात्काळ लक्ष घालावं अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

संजय आणि सुनील राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही वारंवार जीवे मारण्याची धमकी येत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. कालपासून ते छत्रपती संभाजीनगरमध्ये होते. तेव्हापासून सातत्यानं त्यांना धमक्यांचे फोन येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी फोन बंद करुन ठेवला असता त्यांचे बंधू व भांडुप मतदारसंघाचे आमदार सुनील राऊत यांना त्याच व्यक्तीककडून धमकी आल्याचे संजय राऊत म्हणाले. यावेळी सरकारलाच आमचं बरंवाईट व्हावं असं वाटतं आणि त्यामुळे हे सर्व ते घडवत आहेत, असा आरोप संजय राऊतांनी केला.

राजकीय पातळीवर मतभेद असले तरी मनभेद नाहीत : देवेंद्र फडणवीस

दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला यासंबंधी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, “धमकी देणं खपवून घेणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात एक उच्च परंपरा आहे. राजकीय पातळीवर मतभेद असले तरी मनभेद नाहीत. कोणत्याही नेत्याला धमकी देणं किंवा समाजमाध्यमांवर व्यक्त होताना सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणं खपवून घेतलं जाणार नाही. अशा प्रकरणात कायद्याप्रमाणे पोलीस निश्चित कारवाई करतील”‘ अशा कठोर शब्दांत फडणवीसांनी इशारा दिलेला आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -