Wednesday, August 27, 2025

अकस्मात मृत्यूच्या तपासात खूनाचा उलगडा

अकस्मात मृत्यूच्या तपासात खूनाचा उलगडा

विंचूरला मित्रांनीच केला मित्राचा खून

विंचुर : सात दिवसांपूर्वी घरात मृतावस्थेत आढळलेले निवृत्त सैनिक बाळासाहेब पोतले यांचा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी लासलगाव पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. दरम्यान या दोन्ही संशयितांना न्यायालयाने ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितलेला घटनाक्रम असा की, विंचूर येथे दि.१ जून रोजी रात्री नऊच्या सुमारास पांडुरंग नगरला राहणा-या वैशाली किशोर शिंदे या जेवणाचा डबा देण्यासाठी बाळासाहेब पोतलेंच्या घरी गेल्या. मात्र, ते दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी बाजूच्या खिडकीत जाऊन बघितले. तेव्हा बाळासाहेब पोतले हे कॉटवर मयत अवस्थेत झोपलेल्या स्थितीत दिसून आले. पोलिसांना पाचारण केल्यानंतर ते मयत झाल्याचे स्पष्ट झाले. वैशाली शिंदे यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

पोलीस नाईक योगेश शिंदे हे या घटनेचा तपास करत होते. दरम्यान सह पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलिस नाईक योगेश शिंदे , पोकॉ प्रदिप आजगे व पोकॉ कैलास मानकर यांचे पथक तयार करण्यात आले होते. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर घातपात झाल्याचा संशय आल्याने तपासाला वेगळी दिशा मिळाली. मयत बाळासाहेब पोतले यांचे मित्र रामदास सालकाडे व सुनील मोरे दोन्ही राहणारे विंचूर ता. निफाड यांचे मयताकडे दारू पिण्यासाठी वारंवार येणे जाणे होते. परंतु बाळासाहेब पोतले हे मयत झाल्यापासून रामदास सालकडे व सुनील मोरे हे गावातून निघून गेल्याचे तपास पथकाच्या निदर्शनास आले. तांत्रिक माहितीच्या आधारे रामदास सालकडे व सुनील मोरे यांचा शोध घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस करता त्यांनी मयत मित्र बाळासाहेब पोतले यांच्याशी दारू पिण्याच्या कारणावरून बाचाबाची होऊन मयताला कॉटवर जोरात लोटून दिले व नंतर नाक व तोंड दाबून मारल्याची कबुली दिली.

बाळासाहेब पोतले यांच्या शरीराची हालचाल होत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणाहून बाळासाहेब पोतले यांचा मोबाईल हँडसेट शर्ट पॅन्ट मधील रोख रुपये व एटीएम कार्ड चेक बुक तसेच कारची चावी घेऊन मारुती सुझुकी कंपनीची वॅगनर कार क्र. MH 15.FF 5369 कारसह त्या ठिकाणाहून पळून गेले. संपूर्ण शहनिशा केल्यानंतर रामदास मारुती सालकाडे व सुनिल माणिक मोरे यांना निफाड न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना ९ जून पर्यंत पोलिस कस्टडी सुनावली आहे. पुढील तपास सह पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोना योगेश शिंदे,पोकॉ प्रदिप आजगे, पोकॉ कैलास मानकर करत आहेत .

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा