Sunday, March 23, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यमाणसं फणसासारखी अन् फणस...!

माणसं फणसासारखी अन् फणस…!

माझे कोकण : संतोष वायंगणकर

महाराष्ट्रातील कोकण प्रांत म्हटला की, या प्रदेशात इतकी विविधता आहे की, भाषा तर दहा-वीस किलोमीटरवर बदलते. भाषेतील गोडवा, त्यातला शिवराळपणा, त्यातही वाटणारा आपलेपणा हे सारच फारच वेगळं असतं. महाराष्ट्रातील पूर्वीच्या राजकारणातील नेत्यांनी कोकणाचा आणि कोकणात मिळणाऱ्या खेकड्यांचा असा काही संबंध जोडला की, तो थेट कोकणातील माणसांच्या स्वभावाशी नेऊन जोडला. कोकणात खेकड्याच्या मानसिकतेची लोकं राहतात, असा एक उर्वरित महाराष्ट्रातील नेत्यांनी फार पद्धतशीरपणे प्रसार आणि प्रचार केला. त्यामुळे कोकणातील माणसं खरोखरीच आपल्याच माणसांचे पाय ओढतात, असेच एक वातावरण तयार झालं. थोडीफार वस्तुस्थिती असेलही; परंतु या स्थितीवरून कोकणातील माणसं आपल्याच माणसांना पुढे जाण्यापासून रोखतात, कोकणातील माणसांना पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी आणखी-आणखी कोणा बाहेरच्यांची आवश्यकता नाही. कोकणातील आपलाच माणूस आपल्याच माणसाला पुढे जाऊ देत नाही, असं म्हटलही जातं आणि तसा तो समज सर्वदूर पसरला आहे. खरंतर माणसांचे स्वभावगुण हे सर्वसाधारणपणे सगळीकडे सारखेच असतात. जाती, धर्म आणि प्रांत यामध्ये माणसं सारखीच असतात. फक्त थोडेफार वेगळेपण असते. कोकणातील माणूस म्हटला की, तो इतरांपेक्षा थोडा अधिक चिकित्सक, त्याच्या बोलण्यातला तीरकसपणा हा सहज जाणवतो; परंतु त्याचबरोबर तो बुद्धीने हुशार आणि बोलण्यावरून कठीण, कडक वाटला तरीही तो स्वभावाने हळवा, प्रेमळ असाच आहे. अगदी म्हणूनच कोकणच्या माणसांच्या स्वभावगुणांचं वर्णन करताना कोकणातील वरून काटेरी असणाऱ्या फणसाची उपमा दिली आहे. फणसाला वरती काटे असतात; परंतु आतल्या गऱ्यांचा जो गोडवा असतो तो फार वेगळा असतो.

कोकणातील माणसांच्या स्वभावगुण वैशिष्ट्यांमुळेच त्याचं साधर्म्य फणसाशी जोडलं गेलं आहे. तसं शहाळ्याशीही जोडलं आहे. कोकणातील फणस हा खरंतर फारच उपयुक्त ठरला आहे. तीस-चाळीस वर्षांपूर्वी रायवळ आंबे आणि घराशेजारच्या फणसांनी पूर्वीच्या पिढ्यांना आधार दिला आहे. फेब्रुवारी ते जूनपर्यंत रायवळ आंबे, फणस अनेक कुटुंबांच्या चरिर्थाचे साधन बनले आहेत. कोकणातील असलेल्या गरिबीच्या काळात अनेक कुटुंबातून फणसाची कुवरी, फणसाची भाजी तयार झालेला रसाळ (बरका) काफा फणस यांनी सामान्य गोरगरिबांच्या मुलांना जगवले आहे. हे जे आज साठीत आहेत, त्यांनी कोकणातील आपले जुने दिवस आठवले तरी आपल्या घराच्या परिसरातील फणसाच्या झाडांनी किती आणि कसे जगवले आहे याची असंख्य उदाहरणे आहेत. गेल्या काही वर्षांत कोणत्या फळाचा काय उपयोग होतो, त्याची आरोग्यदृष्ट्या उपयुक्तता काय आहे, हे शोधलं गेलं आणि मग त्याप्रमाणे त्याचे उपयोग केले जाऊ लागले. अलीकडेच फणसाच्या उपयोगावरून एक काव्य व्हाॅट्सअॅप ग्रृपवर फारच फिरताना दिसत आहे. त्यातच एका परदेशी व्हीडिओतून फणसाची उपयोगीता कशी आणि किती आहे हे दाखवण्याचा प्रयत्नही केला आहे; परंतु फणसाचा अनेकविध पद्धतीने उपयोग केलेला दिसतो. दुर्दैवाने नव्याने फणसाची लागवड होताना दिसत नाही. पूर्वजांनी जी काही ही जुनी झाडं लावून ठेवली त्याचीच फळं आज आपण खात आहोत.

गेल्या काही वर्षांत आपण रायवळ आंबे किंवा फणसांची नव्याने झाडं उभी राहिली पाहिजेत, यासाठी कोणतेच प्रयत्न करीत नाही आहोत. फणसामध्ये कोणताही रासायनिक खतांचा वापर नाही की, आरोग्यदृष्ट्या त्रासदायक ठरेल असं काही नाही. उलट शरीराला पोषक असणारेच या फणसाच्या गऱ्यातून मिळणारे प्रोटीन आहेत. फणसाच्या प्रत्येक भागाचा उपयोग होऊ शकतो. तो उपयोग करणारेही आहेत. कोकणातील या फणसाचे मार्केटिंग फक्त सत्यवान-सावित्रीच्या कथेतील वटवृक्ष पूजनापुरते मर्यादित न राहता, कोकणातील हा फणस आर्थिक समृद्धी आणणारा आहे. त्यावर आज जी काही प्रक्रिया केली जाते, त्यापेक्षा आणखी काय-काय करता येईल हे पाहिले पाहिजे. तरच आपल्या कोकणातील या फणसातून गोरगरिबांच्या घरात आर्थिक समृद्धी येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -