सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांच्या भूमिपूजनानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, खासदार, आमदार, शासकीय अधिकारी या सर्व कार्यक्रमांना हजर होते. ‘शासन आपल्या दारी’ या योजनेचा शुभारंभ, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी ६८० कोटी रुपयांचा निधी, पर्यटन, उद्योग या व अशा अनेक योजना सुरू करण्याचा संकल्प आणि जगाला हेवा वाटेल, असा कोकण निर्माण करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा कोकणासाठी आणि कोकणातील जनतेच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे, असेच म्हणावे लागेल.
निसर्गरम्य अशा कोकणचा परिसर आज सर्वांनाच भुरळ घालतो आहे. संपूर्ण कोकणाला स्पर्शून अरबी समुद्र पुढे गोव्यापर्यंत पोहोचला. मुंबईपासून गोव्यापर्यंत असा जवळपास सातशे किलोमीटरचा समुद्रकिनारा या प्रदेशाला लाभलेला असल्यामुळे कोकणच्या वैभवात अधिकच भर पडली आहे. शिवाय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दापोलीजवळचे मूळ गाव, स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी व कर्मभूमी, चवदार तळ्याच्या पाणी प्रश्नासाठी बाबासाहेबांना संघर्ष करावा लागला, त्या महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऐतिहासिक स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवनेरी गडावरचा शिवराज्याभिषेक सोहळा, वासुदेव बळवंत फडके यांची कर्मभूमी अशा कितीतरी ऐतिहसिकदृष्ट्या कोकणची भूमी पावन झाली आहे. डोंगर दऱ्या, समुद्रकिनारे, जगप्रसिद्ध कोकणचा हापूस आंबा, नारळ, काजू, फणस यांचे होणारे उत्पादन, अलीकडेच कोकणात निर्माण झालेले चिपी विमानतळ अाणि त्यामुळे कोकणातील जनतेची विमान प्रवासाची झालेली सोय. यासाठी केंद्रीय मंत्री राणे यांचे परिश्रम कारणीभूत ठरले आहेत.
मुंबई-गोवा माहमार्ग आणि कोकणात असणारे आणि येऊ घातलेले उद्योग, कारखाने यामुळे कोकणचे वैभव वाढणार आहे. विद्यमान सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग केंद्रीय मंत्री नारायण राणे महत्त्वाकांक्षी असल्यामुळे आगामी काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संगत-सोबतीने उद्योग निर्मिती होऊन कोकणचा झपाट्याने विकास होणार आहे. कोकणच्या या दौऱ्यानिमिताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामान्य जनतेला छोट्या-मोठ्या कामांसाठी, दाखल्यासाठी सातत्याने सरकारी कार्यालयात यापुढे फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. गतिमान सरकार राज्यात आले आहे. तसे काम गावागावांत होईल आणि प्रत्येक योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थींच्या दारापर्यंत पोहोचेल, सरकारी काम अन् सहा महिने थांब असे यापुढे होणार नाही, असा विश्वास त्यांनी कुडाळ येथील ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमातून दिला. शासकीय योजनांची अंमलबजावणी हे खऱ्या अर्थाने अधिकारी करीत असतात. त्यांच्यामार्फतच या योजना लोकांपर्यंत पोहोचत असतात. म्हणून या अधिकाऱ्यांनी जनसामान्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचवण्याचे काम केले पाहिजे, हे सांगायला मुख्यमंत्री विसरले नाहीत. राज्यातील जनतेला, शेतकरी आणि कष्टकऱ्यांना यापेक्षा काय पाहिजे? राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येऊन जवळपास दहा-अकरा महिने झाले. या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासकामांसाठी ६८० कोटींचा विकासनिधी देण्यात आला आहे. जगाला हेवा वाटला पाहिजे असे कोकण घडविण्यासाठी आणखीही विकास निधी यापुढेही दिला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी इतका निधी आजपर्यंत कोणत्याच सरकारच्या काळात या जिल्ह्याला मिळाला नाही. यावरून मुख्यमंत्र्यांची कणव लक्षात आल्याशिवाय राहत नाही. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे तर मूळ कोकण आणि याच जिल्ह्याचे असल्यामुळे हा जिल्हा आणि कोकण त्यांनी जवळून पाहिला आहे, अनुभवला आहे. कोकण प्रदेशासी त्यांची नाळ जुळलेली असल्यामुळे आधी कोकणचा विकास हेच त्यांचे लक्ष्य आहे. म्हणूनच पर्यटनाच्या माध्यमातून कोकणचा विकास व्हावा, तळ कोकणातील या जिल्ह्यांचा औद्योगिकदृष्ट्या गतिमान विकास व्हावा, यासाठी एमएसएमईच्या माध्यमातून विविध प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात नुकतीच बैठक झाल्याचे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे नारायण राणे यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांच्या ५३ योजना राबवून या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना त्या उपलब्ध करून सर्वांचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल. या माध्यमातून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या तळ कोकणातील जिल्ह्यांचा विकास होईल, असा विश्वास त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केला. तसेच नवनवीन उद्योग उभारून आत्मनिर्भर भारत आणि भारताला ‘महासत्ता’ बनविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वासही केंद्रीय मंत्री राणे यांनी दिला आहे. भविष्यात कोकणात येणाऱ्या उद्योग आणि कारखान्यांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याने अनेकांच्या हाताला काम मिळणार आहे. आधीच कित्येक वर्षांपासून कोकणी माणूस रोजगाराच्या शोधात मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिकसह देशात जिथे कुठे काम मिळेल, तिकडे जात आहे आणि आपला विकास साधत आहे; परंतु नारायण राणे यांच्या रूपाने कोकणातील तरुणाईला संधी चालून आली आहे. या तरुनाईने रोजगाराभिमुख उद्योगधंद्यांचे प्रशिक्षण घ्यावे आणि राणे साहेबांचे मार्गदर्शन आणि त्यासाठी लागणाऱ्या बाबींची पूर्तता करून घेऊन आपले जीवन सुधारण्याच्या आणि कोकणच्या विकासाला हातभार लागावा या दृष्टीने पावले टाकावीत.