पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मान्सून) तब्बल सात दिवस उशिराने, पण केरळात आगमन झाले आहे. मान्सूनने दक्षिण तामिळनाडू आणि केरळचा बराचसा भाग गुरुवारी (ता. ८) व्यापला आहे. अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी जाहीर केले.
देशात मान्सूनच्या पुढील वाटचालीस आता सुरुवात झाली आहे. सध्या मान्सूनने केरळचा बहुतांश भाग, दक्षिण तामिळनाडू, दक्षिण अरबी समुद्राचा उर्वरित भाग, लक्षद्वीप बेटे, ईशान्य आणि मध्य बंगालच्या उपसागराचा भाग व्यापले आहे.
दरम्यान पुढील ४८ तासात संपूर्ण केरळसह तामिळनाडू, कर्नाटक, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आणखीन काही भागात मान्सून प्रगती करेल. असे हवामानशास्त्र विभागाने नमूद केले आहे.
साधारणपणे मान्सून १ जूनपर्यंत (दीर्घकालीन आगमनाच्या वेळेनुसार) केरळमध्ये दाखल होतो. मात्र त्यास विलंब झाला असून प्रत्यक्षात गुरुवारी (ता. ८) केरळमध्ये मान्सूनने आगमन केले आहे. त्यामुळे यंदा मान्सूनने ७ दिवस उशिराने देशाच्या भूभागात केरळमध्ये प्रगती केली. या आधी २०१९ मध्ये ही ८ जूनला मान्सून केरळात पोहोचले होते.
पुढील दोन दिवसात संपूर्ण केरळ व्यापण्याची शक्यता असून मध्य अरबी समुद्र, तामिळनाडूचा आणखी काही भाग, कर्नाटक आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागात तसेच ईशान्येकडील राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.