ज्ञानेश्वरी : प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे
अठराव्या अध्यायात श्रीकृष्णांचा अर्जुनाला प्रश्न ‘तुझा मोह तुझ्याजवळ आहे की नाहीसा झाला?’
यावर अर्जुनाच्या तोंडून ज्ञानदेव जे उत्तर देतात, त्याला तोड नाही. ते इतकं समर्पक, अचूक आहे!
मग अर्जुन देवास म्हणाला की, ‘तुम्ही मला मोहाची अजून आवड आहे की काय असे विचारले, तर तो आपल्या कुटुंबासह ठावठिकाणा सोडून गेला.’
ती ओवी अशी –
मग अर्जुन म्हणे काय देवो?
पुसताति आवडे मोहो।
तरी तो सकुटुंब गेला जी ठावा।
घेऊनि आपला॥ ओवी क्र. १५५८
मोह अगदी मुळापासून नाहीसा झाला हे सांगण्यासाठी योजलेला हा दाखला किती अर्थपूर्ण आहे! मोह हा एक दुर्गुण. अर्जुनाला आपल्या नातेवाइकांचा मोह झाला व भर रणांगणात त्याने लढाईला नकार दिला. तेव्हा त्या मोहापासून अर्जुनाची सुटका करण्यासाठी, त्याला स्वतःच्या रूपाचं (स्वरूपाचं) योग्य ज्ञान देण्यासाठी श्रीकृष्णांनी त्याला उपदेश केला, ती भगवद्गीता! यातील पहिल्या अध्यायात ‘नातेवाइकांसमोर कसे लढू’ अशी भांबावलेल्या अर्जुनाची अवस्था दिसते. पुढे श्रीकृष्णाच्या उपदेशामुळे ‘मी म्हणजे शरीर नाही’ हे अर्जुनाला कळतं. त्याच्यातील हा चांगला बदल अठराव्या अध्यायात ठळकपणे दिसतो. तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला स्पष्टपणे विचारतात, ‘तुझा मोह नाहीसा झाला की नाही?’
यावरचं उत्तर म्हणजे परिवर्तनाचं एक सुंदर चित्र आहे. ‘मोह संपूर्ण नाहीसा झाला’ असं उत्तर अर्जुनाला देता आलं असतं; परंतु ज्ञानदेवांची प्रतिभा असं उत्तर देऊन थांबत नाही. ते वर्णन करतात, ‘मोह आपल्या कुटुंबासह ठावठिकाणा सोडून गेला.’ वा! किती सुरेख कल्पना आहे ही! इथे ज्ञानदेव मोह हा जणू कोणी माणूस आहे अशा प्रकारे वर्णन करतात. कोणताही माणूस हा सहसा एकटा नसतो. तो कुटुंबासह असतो. म्हणून आमंत्रण देतानाही आपण म्हणतो, ‘सहकुटुंब या.’
मोह हा दुर्गुणही एकटा नसतो. मोहासोबत अज्ञान, वासना इ. दुर्गुण जणू त्याचे साथीदार, कुटुंब म्हणावे असे दुर्गुण असतात. मोह नाहीसा व्हायला हवा तर तो सहकुटुंब नष्ट झाला, तर त्याचा संपूर्ण बिमोड होईल. हा मोह राहतो कुठे? तर माणसाच्या मनात, इथे अर्जुनाच्या मनात त्याने मुक्काम केला होता. सुरुवातीला ‘मी कोण?’ याविषयी अर्जुन अज्ञानी होता. ‘मी’ म्हणजे ‘शरीर’ असं तो समजत होता. मग श्रीकृष्णांच्या उपदेशाने त्याच्यातील ‘मोहा’ने काढता पाय घेतला. तेही एकट्याने नव्हे, तर आपल्या कुटुंबकबिल्यासह असं चित्रमय, नाट्यमय वर्णन ज्ञानदेव करतात. पुढील ओवीत ते काव्यमय वर्णन करतात.
सूर्य जवळ आल्यावर डोळ्याला अंधार दृष्टीस पडतो की काय? हे म्हणणे कोणत्या गावी शोभेल?
ती ओवी अशी –
पासीं येऊनि दिनकरें। डोळ्यातें आंधारें।
पुसिजे हें कायि सरे। कोणे गांवीं? ओवी क्र. १५५९
इथे सूर्य म्हणजे ज्ञान देणारे तेजस्वी श्रीकृष्ण, डोळ्यांनी दिसणारा अंधार म्हणजे अर्जुन व इतरांच्या ठिकाणी असलेलं अज्ञान. गाव म्हणजे माणसांचा समूह. श्रीकृष्णांच्या ज्ञानामुळे अर्जुनाच्या मनातील अज्ञानाचा अंधार दूर झाला आहे. पण केवळ अर्जुन नव्हे, तर अर्जुनासह संपूर्ण गाव म्हणजे भगवद्गीतेचे सर्व वाचक आहेत, त्यांच्यातील अज्ञान नाहीसं झालं आहे. असा अर्थ आपण घेऊ शकतो.
अशा प्रकारे मनामनांतील अज्ञान मुळापासून नाहीसं करणाऱ्या भगवद्गीता व ज्ञानेश्वरीलाही कृतज्ञतापूर्वक वंदन!