
विंचूर : फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकोबारायांनी सदेह वैकुंठगमन केले. हा दिवस तुकाराम बीज म्हणून साजरा केला जातो. तुकोबांच्या वैकुंठ गमनाला सन २०२४ - २५ दरम्यान ३७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने निफाड तालुक्यातील भरवस फाटा येथे दि.२ एप्रिल ते दि. ८ एप्रिल २०२४ या कालावधीत जगद्गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याचा मान नाशिकला प्रथमच मिळत असून भरवस फाटा येथे सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील हा पहिलाच कार्यक्रम असल्याने लाखो उपस्थितांचे नियोजन करण्यात येणार आहे. आद्यशंकराचार्य स्थापित चार धर्मपीठातील जगद्गुरुंना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात येणार आहे. तुकोबारायांचे वंशज देहूकर महाराज यांचेसह सर्व संतांचे वंशज, संस्थानांचे पदाधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, केंद्रीय मंत्री आदी राजकीय नेत्यांची उपस्थिती या सोहळ्यास असणार आहे.
सोहळ्यासंदर्भात ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हाभरातील वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी निफाड, येवला, चांदवड, सिन्नर, कोपरगाव या पाच तालुक्यांतील नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. या सोहळ्यात अखंड हरिनाम सप्ताह, श्री तुकोबाराय जीवन चरित्र कथा व पाच हजार गाथा वाचकांचे संगीत गाथा पारायण होणार आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री क्षेत्र देहू येथून पायी ज्योत आणण्यात येणार असून या पादुका निफाड, येवला, चांदवड, सिन्नर, कोपरगाव या पाच तालुक्यांतून हेलिकॉप्टरने भ्रमण करून कार्यक्रमस्थळी आठ दिवस दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. दि.२ एप्रिल ते दि. ८ एप्रिल २०२४ या कालावधीत संपन्न होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या काळात नाशिक जिल्ह्याअंतर्गत १५ तालुक्यांतून प्रत्येकी एक आदर्श कीर्तनकारास 'धन्य तुकोबा समर्थ' हा मानाचा पुरस्कार सोहळ्याच्या वतीने व श्री तुकोबारायांच्या वंशजांच्या हस्ते दिला जाणार आहे.
दैनंदिन कार्यक्रमासाठी वारकरी व भाविकांची मोठया प्रमाणावर उपस्थिती राहणार असल्याने आजूबाजूच्या तालुक्यातील, गावातील नागरिकांच्या सहकार्याने दैनंदिन पंगतीचे नियोजन ठरविण्यात आले आहे. व्यसनमुक्त होऊ पाहणाऱ्या लोकांना दारूबंदी, आणि व्यसनमुक्तीची शपथ देऊन भगवंत कार्यात सहभागी करून घेण्यात येणार आहे. या बैठकीस सर्वश्री. तुकाराम म.परसुलकर, ज्ञानेश्वर माऊली शिंदे (रुई), बाळासाहेब म.वाकचौरे, समाधान म.पगार, जनेश्वर म. (भारतमाता आश्रम), मधुकर म.गडाख, ज्ञानेश्वर म.ठाकरे, श्याम म.गाडे, निलेश म.निकम, सयाजी म.बोंबले, रामदास म.जाधव, बाळनाथ म.देवढे, संतोष म.पोटे, ऋषिकेश म.कुयटे, दत्तु काका राऊत, विठ्ठल अण्णा शेलार, हरिश्चंद्र भवर, शिवाजी जगताप, माणिक म.शेळके, गोरख पवार, संपत ढोमसे, सोपान गायकर, नामदेव रेंढे, पप्पू शिंदे, निवृत्ती जगताप, माधव जगताप, जनार्दन गीते, आदींसह वारकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.