Saturday, July 13, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीसद्गुरू भक्तीचे फळ...

सद्गुरू भक्तीचे फळ…

गजानन महाराज : प्रवीण पांडे, अकोला

डोळ्यांत अश्रू घेऊन, गुरुआज्ञा शिरसावंद्य मानून पितांबर तेथून निघाले व फिरत फिरत कोंडोली या गावी आले.

गावाजवळच असलेल्या एका आंब्याच्या झाडाखाली येऊन रात्रभर बसले. झाडाखाली मुंग्या व मुंगळे त्रास देत होते, म्हणून झाडावर जाऊन बसले. तरी मुंग्या व मुंगळे यांचा त्रास होत होता म्हणून वेगवेगळ्या फांद्यांवर फिरत होते. हे पाहून गुरख्यांना कौतुक वाटले. त्यांना वाटले की, ‘हा मनुष्य सझाडावर फांद्या बदलत का बरे फिरत आहे? आणि झाडावर इकडून तिकडे फिरत असताना हा पडला कसा नाही? आश्चर्य आहे.’ त्यावर दुसरा म्हणाला, ‘यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. गजाननाच्या शिष्याठायी असे सामर्थ्य असते. यावरून हा त्यांचा शिष्य असावा.’गुरख्यांकडून गावातील लोकांस हे वृत्त कळले. कोंडोली गावातील लोक तिथे आले. कोणी असे बोलले की, ‘हा ढोंगी असावा. उगीच हा असे वागत आहे.’

एक मनुष्य पुढे होऊन पितंबरास म्हणाला, ‘तू कोठील आहेस, कोण आहेस, तुझे गुरू कोण?’ यावर पितांबर म्हणाले, ‘मी पितांबर शिंपी असून श्री गजानन महाराजांचा शिष्य आहे. गुरुआज्ञेवरून पर्यटन करत इथे आलो. मुंगळ्यांच्या त्रासामुळे झाडावर बसलो.’

त्यावर लोक म्हणाले, ‘तू जर खरंच गजाननाचा शिष्य असशील, तर त्यांच्याप्रमाणे चमत्कार करून दाखव. हा बळीराम पाटलाचा आंब्याचा वठलेला वृक्ष हिरवागार करून दाखव. नाही तर तुझी इथे धडगत नाही.’ हे ऐकून पितांबर म्हणाले, ‘माझी सारी कथा ऐका. मी अधिकारी नाही. पण गुरूंच्या नावाला लपवू कशाला?.’ पण लोक ऐकेनात. निरुपाय होऊन पितांबराने सद्गुरूंचा धावा केला, प्रार्थना केली.

एवढे करताच त्या वठलेल्या आम्रवृक्षास कोवळी पालवी फुटली. हा चमत्कार पाहून लोक पितंबरास ‘पितांबर महाराज’ म्हणून ओळखू लागले. कोंडोली गावातच त्यांचा मठ स्थापन झाला. सद्गुरू आपल्या शिष्यास कोठेही कमी ठरू देत नाहीत. इथे श्री गजानन महाराजांनी पितंबरास अधिकारी सत्पुरुष तर बनाविलेच, पण सदैव पाठीशी उभे राहून त्यांच्या करवी चमत्कार देखील घडवून आणले. हेच सद्गुरू भक्तीचे फळ. म्हणतात ना…
‘खुद का नाम टले चल जाये
भक्त का नाम ना ढलते देखा’

पुढे महाराज एकदा मठात उद्विग्न चित्ताने बसेले होते. हे पाहून शिष्य मंडळी काळजीत पडली आणि महराजांना ‘काय झाले?’ म्हणून विचारपूस करू लागली. त्यावर महाराज बोलले ‘आमचा भक्त कृष्णाजी पाटील गेला. आता मी काही या मठात आता राहणार नाही’.

असे महाराजांचे बोलणे ऐकून शिष्यांना चिंता वाटू लागली की, महाराज येथून निघून तर जाणार नाहीत? म्हणून श्रीपत राव, बंकटलाल ताराचंद मारुती अशी मंडळी मठात आली आणि महाराजांना नमस्कार करून विनंती करू लागली की, ‘महाराज तुम्ही हे ठिकाण सोडून इतरत्र कुठेही जाऊ नये. तुमची जेथे इच्छा असेल तिथेच, शेगावातच आपण राहावे. पण शेगाव सोडून
जाऊ नका.’

यावर महाराज म्हणाले, ‘तुमच्या गावात दुफळी आहे. मला कोणाची जागा नको. अशी जागा द्याल जी कोणाच्या मालकीची नसेल, तरच माझे इथे राहणे होईल’. हे ऐकून मंडळी पेचात पडली. महाराज अशी जागा म्हणत आहेत, जी कोणाच्या मालकीची नाही आणि सरकार महाराजांकरिता जागा देईल, हे शक्य वाटत नाही. शिष्य महाराजांना म्हणाले, ‘हे राज्य परक्याचे आहे. सरकार धार्मिक कार्यास जागा देईल, हा आम्हाला भरावसा वाटत नाही म्हणून आम्हापैकी कोणाची जागा मागून घ्या. आमची तयारी आहे.’ त्यावर महाराज म्हणाले,
राजे कित्येक भूमीवरी।
आजवरी झाले जरी।
जागा कशाची सरकारी।
इचा मालक पांडुरंग।। १४०।।

सर्व मिळून हरी पाटलाकडे आले. त्यांच्या सल्ल्याने अर्ज करून सरकारकडे जागा मागणी केली. बुलढाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी ज्यांचे नाव ‘करी’ असे होते, त्यांनी एक एकर जागा मंजूर केली आणि म्हणाले की, ‘तुम्ही दोन एकराकरिता अर्ज केला आहे तरी तूर्तास तुम्हाला एक एकर जागा देत आहे. तुम्ही एक वर्षात जागा व्यवस्थित केल्यास अजून एक एकर जागा अजून देऊ.’ अशा प्रकारे जागा मिळाल्यावर हरी पाटील, बंकट लाल हे लोक वर्गणी गोळा करण्यास निघाले. अल्पावधीतच द्रव्यनिधी जमला आणि मठाचे काम सुरू झाले. यापुढील वृत्तान्त पुढील अध्यायात येईल.

क्रमशः

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -