Wednesday, July 17, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीसद्गुरू वाचोनि सापडेना सोय

सद्गुरू वाचोनि सापडेना सोय

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै

मी माझ्या प्रवचनांतून हे बरेचदा सांगितले आहे की, सत् चित् आनंद हे जे शब्द आहेत, त्या सच्चिदानंद स्वरूपालाच देव असे म्हटलेले आहे. त्याला आपण वेगवेगळी नावे दिली ते वेगळे. मात्र खरा देव कोण या प्रश्नाचे योग्य उत्तर म्हणजे सच्चिदानंद स्वरूप हाच खरा देव. या ठिकाणी प्रामुख्याने दिव्य ज्ञान आहे, दिव्य जाणीव आहे व दिव्य शक्ती आहे. खूप काही आहे व ते सगळे दिव्य आहे, इतकेच नव्हे, तर त्याच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट दिव्य आहे. त्याचे ज्ञान दिव्य, त्याची निर्मिती दिव्य, त्याचा आनंद दिव्य, त्याची शक्ती दिव्य. तो सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे. असे एकही ठिकाण नाही की, तो तेथे नाही व तो सर्व ठिकाणी भरलेला आहे, हे समजून घेतानाच लोकांची गडबड होते.

लोक विचारतात की जर तो सर्व ठिकाणी भरलेला आहे, तर तो अनुभवाला का येत नाही? याचे कारण असे की, एखादी गोष्ट जितकी अधिक सूक्ष्म तितकीच ती आपल्याला सहजासहजी अनुभावाला येण्याची शक्यता कमी. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही पाच तत्त्वे आहेत. या पाच तत्त्वांपैकी पृथ्वी सहज डोळ्यांना दिसते व ती स्थूल आहे, परिमित आहे, उपयुक्त आहे पण ती लिमिटेड आहे. यापुढे पाणी हे तत्त्व पृथ्वीपेक्षा अधिक सूक्ष्म आहे. मात्र पृथ्वीपेक्षा जास्त उपलब्ध आहे व जास्त उपयुक्त आहे. प्रकाश हे तत्त्व या दोन तत्त्वांपेक्षा सूक्ष्म आहे. तो सर्व ठिकाणी प्राप्त होतो, त्यासाठी पैसे खर्च करावा लागत नाही. पाणी तरी दुर्मीळ होते. मात्र प्रकाशाचे तसे नाही. हा पहिल्या दोन तत्त्वांपेक्षा अधिक उपयुक्त, अपिरिमित व जास्त व्यापक आहे. यांच्यापलीकडे वायू म्हणजे हवा. ही पहिल्या तीन तत्त्वांपेक्षा अधिक महत्त्वाची, अत्यंत सूक्ष्म, अधिक उपलब्ध, अधिक उपयुक्त. केव्हाही व कुठेही उपलब्ध. जिथे तुमचे नाक जाईल, तिथे हवा उपलब्ध. सुदैवाने हवेचा काळाबाजार करता आलेला नाही. तो जर करता आला असता, तर काय परिस्थिती आली असती? प्रकाश आणि हवा यांचा काळाबाजार करता येत नाही मात्र पाण्याचा काळाबाजार होतो. हवा पहिल्या तीन तत्त्वांपेक्षा अत्यंत सूक्ष्म, अत्यंत उपयुक्त, जास्त उपलब्ध ही गोष्ट ध्यानात आली, तर पुढचे जे तत्त्व आहे ते आकाश.

आकाश सर्व ठिकाणी आहे. अनंत कोटी ब्रह्मांडे आकाशात आहेत. सगळीकडे ते दिसते. आकाश इतके आवश्यक आहे की, आकाशाशिवाय आपण असूच शकत नाही. तुम्ही आम्ही सर्व आकाशात आहोत. ते सगळीकडे उपलब्ध आहे. ते अत्यंत सूक्ष्म मात्र अतिशय उपयुक्त आहे. त्या पलीकडे Conscious Mind आहे. हे जे Conscious Mind आहे, त्यालाच ‘चित्ताकाश’ म्हणतात. सगळीकडे जे आहे ते ‘भूतकाश’. हे चित्ताकाश हे पहिल्या सर्व तत्त्वांपेक्षा अत्यंत सूक्ष्म अत्यंत उपयुक्त व सर्व ठिकाणी उपलब्ध आहे. त्याहीपलीकडे आहे Cosmic Life Force. जे सर्व तत्त्वांपेक्षा अत्यंत अधिक सूक्ष्म, अत्यंत अधिक उपलब्ध व अत्यंत अधिक उपयुक्त आहे.

एके ठिकाणी डॉक्टर मर्फी म्हणतात, ‘God is life and life principle is flowing through you’. Tendency of life हा शब्द बरोबर आहे. God is life and life is god. या सर्व गोष्टींचे ज्ञान प्राप्त करायचे असते ते सद्गुरूंकडून, सद्गुरूकृपेनेच. म्हणूनच ‘सद्गुरू वाचोनि सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी’.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -