मुंबई : मरीन ड्राइव्ह येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात बलात्कार करुन एका मुलीची हत्या करण्यात आल्यानंतर ‘त्या’ हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटना घडल्यानंतर २४ तासांच्या आत इतर सर्व मुली हॉस्टेल सोडून निघून गेल्या आहेत.
बुधवारी घडलेल्या घटनेनंतर हॉस्टेलमध्ये वास्तव्यास असलेल्या जवळपास सर्व विद्यार्थीनीनी जागा सोडणे पसंत केले. त्यामुळे या हॉस्टेलमध्ये भयानक शांतता असल्याचे दिसून येते.
दरम्यान, पीडितेच्या आई वडिलांनी पोलिसांसह त्या वसतिगृहात जाऊन पाहाणी केली. आमच्या मुलीने त्या ठिकाणी घडत असलेल्या परिस्थितीची कल्पना दिली होती, आम्ही तिला रितसर तक्रार करण्यास सांगितले होते. पण इथला कारभार इतका भोंगळ होता की कशाला कशाचा पत्ता नव्हता. आमची मुलगी तर गेली, पण तिला न्याय मिळाला पाहिजे हीच अपेक्षा आहे, असे त्या मुलीच्या आई-वडिलांनी म्हटले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, पीडितीचा शरीरावर जखमही होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात पाठवला होता. त्याचसोबत पोलिसांनी केलेल्या तपासात ही घटना सोमवारी रात्री ११.३० ते मंगळवारी पहाटे ४.४५ च्या दरम्यान घडली होती. पीडित मुलीचा मैत्रिणीने तिला रात्री ११.३० वाजता शेवटचे पाहिले होते.
वसतिगृहातील सीसीटीव्हीमध्ये आरोपी ओमप्रकाश कनोजिया हा पहाटे ४:४४ वाजता तेथून निघून गेला आणि त्याने पहाटे ४:५८ वाजता चर्नी रोड रेल्वे स्टेशनवर आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांना आरोपीच्या खिशात कुलुपाच्या चाव्या सापडल्या. त्यातील एक चावी ही त्या मुलीच्या रुमची होती. आरोपीने मुलीच्या रुमला कुलूप लावले आणि चावी आपल्यासोबत घेतली.
पोलिसांनी आतापर्यंत हॉस्टेलमधील सात ते आठ जणांचे जबाब नोंदवले आहेत. पुढील तपास अजून सुरू आहे. वसतिगृहातील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नसल्याचा पोलिसांचा दावा आहे. या वसतिगृहात महिला सुरक्षा रक्षक नाहीत आणि शासकीय निविदा प्रक्रियेच्या आधारे तीन सुरक्षा रक्षक असायला पाहिजे होते.
दरम्यान, पीडित आणि आरोपी दोघांचेही मृतदेह त्यांचा कुटुंबीयांनी अद्याप ताब्यात घेतले नाहीत.