Thursday, May 8, 2025

महाराष्ट्रराजकीयमहत्वाची बातमी

'कायदा मोडणाऱ्याला पाठिशी घालणार नाही'

'कायदा मोडणाऱ्याला पाठिशी घालणार नाही'

कोल्हापूरच्या जनतेला मुख्यमंत्र्यांचे शांतता पाळण्याचे आवाहन


कोल्हापूर : सोशल मीडियातून आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक पुकारली. या बंदला शहरवासियांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हिंदुत्ववादी संघटनांचे हजारो कार्यकर्ते छत्रपती शिवाजी चौकात जमले. यावेळी काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याने पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला. सध्या शहरात तणाव असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे.


कोल्हापूरमधील घटनेवर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, 'राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सगळ्यांचे सहकार्य आवश्यक आहे. राज्य सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम गृह विभागाचे आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांशी वैयक्तिकरित्या बोलतोय, ते माझ्या संपर्कात आहेत. गृहमंत्रीही स्वतः अधिकाऱ्यांशी बोलत आहेत. कुणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेणाऱ्याला पाठिशी घातले जाणार नाही,' असा इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.


ते पुढे म्हणाले की, 'राज्यात कायदा सुवव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम सरकारचे आहे. सगळ्या नागरिकांनाही कायदा राखण्याचे आवाहन करतो. सगळ्यांनी सहकार्य करावे. मी सातत्याने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्कात आहे. कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी गृह विभाग घेत आहे. स्वतः गृहमंत्रीदेखील या प्रकरणात जातीने लक्ष घालून आहेत,' असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment