भाजप आमदार नितेश राणे यांचा खळबळजनक आरोप
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले असून काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्याचे समोर येत आहे. यापार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कोल्हापूरमध्ये दंगली घडवण्यामागे हात असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
राज्यात औरंगजेबावरचे प्रेम अचानक आलेले नाही, त्यामागे निश्चित सूत्र आहे. काही महिन्यांपासून संजय राऊत महाराष्ट्र राज्यात दंगल होणार आहे, असे बोलत आहे, तेव्हापासून हे प्रकार सुरू झाले आहेत, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. या दंगलीमागे उद्धव ठाकरे मास्टर माईंड आहेत का? उद्धव ठाकरे यांची नार्कोटेस्ट करा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. त्यांना मोगलाईचे राज्य आणायचे असेल तर स्वराज्य रक्षणासाठी आम्ही लढायला तयार आहोत, असा इशारा राणेंनी दिला आहे.
याआधी कोल्हापूरमधील मटण मार्केट, महापालिका परिसर, लक्ष्मीपुरी बाजार आणि सीपीआर हॉस्पिटलच्या मागील बाजूला दगडफेक झाल्याची माहिती आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिकांडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला असल्याचे समजते.
हे सगळं कोण घडवतंय याचा विचार करायला पाहिजे. याकूब मेमन व औरंगजेबाच्या थडग्याचे सुशोभिकरण कोणी केले? तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. कोल्हापूरचा काँग्रेसचा नेता सांगतो की, दंगल होऊ शकते आणि लगेच काही जण औरंगजेबाचे स्टेटस ठेवतात. या सगळ्यांवर सरकारची नजर आहे. हे हिंदुत्ववादी सरकार आहे. येथे काय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाही किंवा हसन मुश्रीफ कोल्हापूरचे पालकमंत्री नाही. राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आहे. त्यामुळे यांच्यावर कारवाई निश्चितपणे होणारच, असे राणे म्हणाले.
दरम्यान, शिवराज्याभिषेक दिनी सोशल मीडियावर वादग्रस्त स्टेटस् ठेवल्यामुळे कालपासून कोल्हापूर शहरातील वातावरण तापले आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे स्टेटस ठेवल्याच्या निषेध म्हणून हिंदुत्ववादी संघटनांकडून आज शहर बंदची हाक देण्यात आली होती. अशातच काही संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर जमावाने सुमारे ३ तासांहून अधिक काळ घोषणाबाजी केली. तसेच ‘जय श्रीराम’चा नारा देत या घटनेतील संशयितांवर कडक कारवाई करावी, यासाठी आंदोलन केले.