Thursday, July 18, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यकुटुंबातील महिलांमध्ये असावा सुसंवाद आणि समन्वय...

कुटुंबातील महिलांमध्ये असावा सुसंवाद आणि समन्वय…

  • फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे

घर म्हटलं की, भांड्याला भांड लागणारच… असं आपण म्हणतो पण या भांड्यांचा प्रमाणापेक्षा जास्त आवाज होणं आणि तो घराबाहेर जाणं कुटुंबासाठी अत्यंत धोकादायक असतं. आपल्या घरातील प्रत्येक गोष्ट सावरणं, सांभाळणं, जपणं हे त्या घरातील प्रत्येक महिलेच्या हातात असतं. घरातील अनेक अशा गोष्टी असतात ज्यात पुरुष काहीच करू शकत नाहीत, त्याला करताही येत नाही आणि त्याला तेवढा वेळपण मिळत नाही. अथवा तो अनेकदा हतबल असतो. सगळ्यांना एकत्र धरून राहणं, कुटुंब टिकवणं यासाठी तो झटत असतो. घरातील पुरुष मंडळी घराची आर्थिक जबाबदारी घेतात, सगळं काही पुरवतात, कुठे काही कमी पडायला नको म्हणून मेहनत घेतात तसेच इतर अनेक बाबतीतील ताण-तणाव पुरुषांवर असतोच. घरातील महिलांमध्ये जर एकमत, एकोपा नसेल, तर घराची दैना व्हायला वेळ लागत नाही. सगळे एकत्र एका घरात राहणारे असोत किंवा वेगवेगळे राहायला असोत, कोणत्याही नात्याने बांधलेल्या असोत महिला एकमताने असणे किती गरजेचे आहे आणि तसे नसल्यास काय होते, हे आपण एका समुपदेशनला आलेल्या प्रकरणाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहणारे मोठे पण मध्यमवर्गीय कुटुंब केवळ महिलांमध्ये ताळमेळ नसल्याने कशाप्रकारे उद्ध्वस्त होऊ शकते, यावर आपण प्रकाशझोत टाकणार आहोत. घरातील तीन भाऊ कमावते आणि तिघेही विवाहित असून त्यांच्याच घरात राहायला त्यांची घटस्फोट झालेली ऐक मोठी बहीण तिच्या दोन मुलांना घेऊन कायमस्वरूपी आलेली. त्यांच्यामध्येच राहायला अविवाहित असलेली अजून एक मोठी बहीण, धाकटी लग्नाची एक बहीण, तीन भावांच्या तीन बायका, त्यांची मुलं-मुली आणि आई, असं हे कुटुंब. खाऊन पिऊन सुखी, बाळगोपाळांनी भरलेलं. स्वतःचा बंगला, गाडी, थोडी जमीन, शेती! सुखी-समाधानी जीवन जगावं असं सगळं असूनसुद्धा केवळ जगण्याची, वागण्याची रित न समजल्यामुळे, सुसंवाद साधता न आल्यामुळे घराला घरपण राहिलं नव्हतं. घरातीत महिलांचे कोणत्याही गोष्टीवर एकमत नसणे, बहिणींचा ग्रुप वेगळा, तीन सुनांचा ग्रुप वेगळा, त्यात परत प्रत्येक नवरा-बायको, त्यांची मुलं हा ग्रुप वेगळा असे घरातच अनेक ग्रुप झालेले होते. प्रत्येकाचे विचार, सवयी, वागणूक, स्वभाव नानाविध प्रकारचे होते आणि संस्कारपण वेगवेगळे होते. आत्या, काकू, आजी, आई या सगळ्यांनी मुलांना भेदभाव शिकवलेला, बायकांनी नवऱ्याचे एकमेकांबद्दल कान भरलेले, तोंडावर गोड बोलणे, सतत पाठीमागे एकमेकींची निंदा करणे, सासरच्या घरात घडलेल्या छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक सुनेने आपल्या माहेरी सांगणे, त्यावर तिघी सु्नांच्या माहेरावरून विविध सल्ले दिले जाणे या सवयीमुळे घरातील महिला ज्यांची संख्या घरातील पुरुष माणसांपेक्षा जास्त होती. त्यांच्यात सतत कुरबुरी होऊ लागल्या होत्या. तिघेही भाऊ नोकरी, व्यवसायानिमित्ताने दिवसभर घराबाहेर असल्यामुळे, कधी टूरला असल्यामुळे घरात रोज काय घडतं याबद्दल त्यांना जास्त माहिती नव्हते. यातील दोन भाऊ जेव्हा समुपदेशनसाठी, मार्गदर्शनासाठी आले होते, तेव्हा हे कुटुंब आता मागील काही वर्षांत घडलेल्या घडामोडींमुळे किती मोठ्या भावनिक, मानसिक, आर्थिक, शारीरिक त्रासातून जात आहेत, हे निदर्शनास आले. त्यांच्या सांगण्यानुसार वारंवार घरात नणंद-भावजयांमधील होणारा वाद, बहिणींनी एकत्र येऊन सतत भावाच्या बायकांना टोमणे मारणे, सतत भाच्यांना उलट-सुलट बोलत राहणे, त्यांचा उद्धार करत राहणे, त्यावर घरातील सुनापण प्रतिक्रिया देत राहणे, त्यातून वाद होणे, यामुळे घरातील मुलं या गोष्टीला कंटाळून शिकण्याच्या निम्मिताने घरापासून लांब राहून शिक्षण घेत होती. कोणी वसतिगृहात राहात होते, तर कोणी रूम करून राहात होते.

मुलांना इच्छा नसतानासुद्धा केवळ घरातील कलुषित वातावरणामुळे बाहेर शिकायला ठेवल्याने त्यांच्यावरील खर्च वाढला होता, मुलां-मुलींबाबतीत जोखीम वाढली होती. घटस्फोटित बहीण जी भावांच्या घरात राहात होती, तिला वाटू लागले भावांनी स्वतःची मुलं चांगल्या ठिकाणी शिकायला ठेवलीत आणि माझ्या मुलांवर खर्च नको म्हणून त्यांना इथेच राहू दिलं. तिच्या मुलांनी पण मामांबद्दल असाच ग्रह करुन घेतला होता आणि त्यांची वागणूक उद्धट, उर्मट होऊन मामांबद्दलचा आदर कमी झाला होता. त्यातून ही घटस्फोटित महिला सतत भावजयांना मुलांच्या शिक्षणावरून ऐकवणूक करत होती आणि घरात फट वाढत गेली होती. अजून एक गोष्ट घरात सातत्याने होत होती, ती म्हणजे घर काम, शेती कामावरून भांडण ! अविवाहित आणि घटस्फोटित बहीण या दोघींची मानसिकता अशी झाली होती की, आम्हाला मुद्दाम जास्त काम दिलं जातं, आम्ही मजबूर आहोत, लाचार आहोत, आम्ही कमवत्या नाही, भावांवर अवलंबून आहोत म्हणून आमच्या परिस्थितीचा गैरफायदा आमच्या भावजया घेत आहेत. आमच्याकडून नोकरासारखे काबाडकष्ट करून घेतले जातात. दोनवेळच्या जेवणाच्या बदल्यात आमचीच पिळवणूक भाऊ आणि त्यांच्या बायका संगनमताने करतात. समुपदेशन दरम्यान भावांच्या सांगण्यानुसार खरंतर असं काहीच नव्हतं. सगळेच सगळी कामं करत होती, त्यांच्या बायका बऱ्यापैकी शिकलेल्या असल्यामुळे त्या बाहेर कामाला जात होत्या, कोणी स्वतःचा व्यवसाय करीत होत्या, तर कोणी नोकरीला जात होतं. पर्यायाने घटस्फोटित आणि अविवाहित दोन्ही बहिणी तितक्या सुशिक्षित नसल्याने त्यांच्यावर घरकामाची, शेतीची जबाबदारी पडत होती.

स्वयंपाकघरात होणाऱ्या छोट्या-छोट्या कटकटी कधी कधी खूप मोठ्या भांडणात रूपांतरित होत होत्या. कुटुंबाची घडी विस्कळीत होत होती. एकजण एक पदार्थ बनवणार, तर दुसरी त्यात खोड्या काढणार, एकजण बाहेरून काही आणलं तर दुसरी तोंड वाकडं करणार, एकीनं काही बनवलं तर दुसरी ते फेकून देणार, असा गोंधळ वाढत चालला होता. सगळे कुठे लग्न कार्यासाठी बाहेर एकत्र गेले तरी एकमेकांच्या तक्रारी तिथे सांगत राहायच्या, घरातील मतभेद जगजाहीर करायचे, या सवयी प्रत्येकीला लागल्या होत्या. प्रत्येकीचा दृष्टिकोन एकमेकांना दोष देणं, दुसरीला चुकीचं सिद्ध करणं, कुरघोड्या करणं असाच झालेला होता. या वातावरणामुळे मोठा भाऊ त्यातल्या त्यात जास्त उत्पन्न असल्यामुळे, स्वतःच्या हिमतीवर चांगला सेटल होऊ शकत असल्याने स्वतःची बायको घेऊन रोजच्या कटकटीला कंटाळून वेगळं निघून स्वतंत्र घर घेऊन राहू लागला होता. धाकट्या भावाची बायको जास्त शिकलेली असल्यामुळे, हुशार आणि दिसायला, वागायचं एकदम मॉडर्न विचारांची, सुशिक्षित माहेर असलेली असल्यामुळे स्वतःचा व्यवसाय तसेच करिअर करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असल्यामुळे घरकाम, जुनाट विचार, नंदाची अपमानास्पद बोलणी ऐकून घ्यायला सासूचा सासुरवास सहन करायला अजिबात तयार नव्हती. तिने घरात हे समजावण्याचा खूपदा प्रयत्न केला होता, सगळ्यांना बदलण्याचा तिने पूर्ण प्रयत्न केला होता. पण तिला यश आलं नव्हतं. तिच्या नवऱ्याला मात्र वेगळं निघून राहण्याइतपत उत्पन्न नसल्याने आणि मुळात त्याला कुटुंब तोडायची इच्छा होत नसल्याने तोही हतबल झाला होता. इकडे आड, तिकडे विहीर अशी त्याची गत झाली होती. कोणताच निर्णय तो घेऊ न शकल्यामुळे त्याची बायको सहा महिन्यांपासून माहेरी निघून गेली होती. मुलांची अॅडमिशनपण तिने तिच्या माहेरीच करून घेतली होती. नवऱ्याला तिने फारकतीसाठी कायदेशीर नोटीस पाठवून दिली होती. कालांतराने या कुटुंबातील हे सर्व वादविवाद त्यांच्या समाजात, नातेवाईकात पसरले असल्यामुळे धाकट्या बहिणीचे लग्न जमत नव्हते, तिचे वय वाढत चालले होते. त्यामुळे तिची चिडचिड होऊ लागली होती. ती सगळा दोष घरातल्या लोकांना देत होती. या सर्व घडामोडीचा मनस्ताप झाल्यामुळे आई मात्र जास्त आजारी पडली होती. तिची जबाबदारी घ्यायची कोणी, तिचा औषध-उपचार खर्च उचलायचा कोणी, तिला सांभाळायचं कोणी यामुळे आता अजून मतभेद होऊ लागले होते. मधल्या भावाची मुलगी जी घरातील या वातावरणाला कंटाळून बाहेरगावी शिकायला ठेवली होती, तिने नुकताच घरात कोणाला न सांगता आंतरजातीय प्रेमविवाह परस्पर करून घेतला होता. असो, एकूणच घरातील काम वाटून घ्या, कामाचं वेळापत्रक ठरवा म्हणजे कोणा एकीवर जास्त काम पडणार नाही. सतत भूतकाळात झालेल्या चुका एकमेकींना बोलून दाखवू नका, मुलांच्या भविष्यासाठी एखादा फॅमिली बिजनेस तयार करा. भाऊ सांगत होते घरातील सुनाना बहिणीमध्ये मिक्स करुन घ्या, सगळी मुलं सारखी धरा आळीपाळीने मुलांचा अभ्यास घ्या, त्यांना एकी शिकवा, त्यांना आयुष्य भर एकत्र राहायचं आहे. यावरून आपण घरातील महिला मंडळ किती एकीने, निकोप, निस्वार्थी आणि शुद्ध मानसिकतेने एकत्र असणे आवश्यक आहे हे लक्षात घ्यावे.

meenonline@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -