हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, दगडफेक आणि लाठीमार!
कोल्हापूर : सोशल मीडियातून आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील दैनंदिन व्यवहार ठप्प आहेत. शहरातील केएमटी बससेवा, प्रवासी रिक्षा वाहतूकही बंद आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या हजारो कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात जमून संशयितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, बिंदू चौक आणि गंजी गल्ली परिसरात परिसरात दगडफेक केल्याने जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. यावेळी जमावाला नियंत्रित करताना पोलिसांची दमछाक झाली.
परिस्थिती तणावपूर्ण बनत असल्याने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांना चर्चेसाठी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात बोलवले. दरम्यान, बिंदू चौकात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. एसआरपीएफ, दंगल काबू पथकासह, सुमारे एक हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात आहेत.
आक्रमक जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी फोडल्या अश्रूधुराच्या कांड्या
जमावाकडून अनेक दुकानांची, मालगाड्यांची तोडफोड करण्यात आली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला तरी परिस्थिती नियंत्रणात येत नसल्यामुळे काही ठिकाणी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे जमाव सैरभैर झाल्याने परिस्थिती पोलिसांच्या आवाक्या बाहेर गेली.
जोतिबा डोंगरावर कडकडीत बंद
कोल्हापुरातील तणावाचे पडसाद जोतिबा डोंगरावर उमटले. संपुर्ण जोतिबा मंदिर मार्गावरील व गावातील दुकाने बंद ठेऊन बंदला नागरिकांचा शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. मात्र, भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी दर्शनासाठी जोतिबा मंदिर खुले ठेवण्यात आले होते.
गृहविभागाचे कोल्हापूर पोलिसांना आदेश
औरंगजेबाची स्तुती करणाऱ्यांना महाराष्ट्रात माफी नाही. असे सांगत, जनतेला शांतता पाळण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले आहे. तसेच, कोल्हापूर पोलिसांना दोषींवर कठोर कारवाई करा, अशी सूचनादेखील दिली आहे. कुणी चुकीचे वागत असेल तर त्याच्यावर कारवाई करा. तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणा, असे निर्देश गृहविभागाने दिले आहेत.
समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या ६ जणांना अटक
या घटनेत दोषी असणाऱ्या काल दगडफेक करणाऱ्या आणि आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या ६ जणांना अटक करण्यात आल्याचे कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. कोल्हापुरातील परिस्थिति नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले.
कोल्हापुरात इंटरनेट बंद करण्याचे मोबाईल कंपन्यांना आदेश
आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. बिंदू चौक, अंबाबाई मंदिर परिसर, महाद्वार रोड या परिसरात तरुण मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कंपन्यांना इंटरनेट बंद करण्याचे आदेश दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.