हिंदुत्ववादी संघटनांचे भजन आंदोलन
नागरिकांनी संयम बाळगून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे पोलीसांचे आवाहन
धुळे (प्रतिनिधी): धुळे शहरातील मोगलाई परिसरात एका धार्मिक स्थळातील मूर्तीची विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला आहे. या संदर्भात विटंबना करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी मंदिराच्या आवारात भजन आंदोलन करण्यात आले असून या आरोपींना अटक करून कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये, असे आश्वासन पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिले आहे.
धुळे शहरातील मोगलाई परिसरात असणाऱ्या एका धार्मिक स्थळात आज सकाळी एक महिला दर्शनासाठी गेली असता तिला मूर्तीची विटंबना झाल्याचा प्रकार निदर्शनास आला. तिने हा प्रकार परिसरातील नागरिकांना सांगितल्यामुळे मंदिर परिसरात मोठी गर्दी गोळा झाली. दरम्यान पोलीस प्रशासनाला माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक ऋषिकेश रेड्डी, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले. मंदिर परिसरामध्ये हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने भजन आंदोलन करून आपला रोष व्यक्त करण्यात आला. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री योगेश मैंद, भाजपचे रोहित चांदोडे तसेच राजेंद्र खंडेलवाल, भरत देवळे, यांच्यासह अनेकांनी पोलीस प्रशासनाशी चर्चा केली. मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीला तातडीने अटक करावी अन्यथा शहरांमध्ये निषेध आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी कार्यकर्त्यांनी दिला. दरम्यान दुपारपर्यंत संशयित व्यक्तींची चौकशी करण्याचे काम सुरू होते.
या संदर्भात प्रतिक्रिया देताना पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सांगितले की, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या संबंधितांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. मात्र नागरिकांनी संयम राखावा. कोणत्याही अफवेला बळी पडू नये, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन यावेळेस बारकुंड यांनी केले आहे.
मंत्री गिरीश महाजन आणि आमदार नितेश राणे यांच्याकडून दखल
धुळ्यातील मोगलाई परिसरात विटंबना झालेल्या धार्मिक स्थळाला जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी भेट दिली. यावेळी हिंदुत्ववादी संघटनेच्यावतीने भारतीय जनता पार्टीचे रोहित चांदोडे यांनी परिस्थितीची माहिती दिली. या ठिकाणी यापूर्वी दोन वेळेस विटंबनेचा प्रयत्न झालेला असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. विटंबना करणाऱ्या संशयताला ताब्यात घेतले जाईल. मात्र त्यामागे असणारा सूत्रधार देखील बाहेर आला पाहिजे. त्याच्यावर कठोर कारवाई झाल्याशिवाय धार्मिक तेढ करण्याचे हे प्रकार थांबणार नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने कोणतीही तमा न बाळगता तातडीने सूत्रधार याला गजाआड करण्याची मागणी यावेळी केली .त्यानंतर त्यांनी भ्रमणध्वनीवरून ही माहिती राज्याचे मंत्री गिरीश महाजन तसेच भाजपा नेते नितेश राणे यांना देखील दिली त्यानुसार धार्मिक स्थळातील मूर्ती विटंबनाच्या घटनेची राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी दखल घेतली असून त्यांनी भ्रमणध्वनीवरून जिल्हाधिकारी जलज शर्मा तसेच पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्याशी थेट संवाद साधून माहिती घेतली. यावेळी समाजकंटकांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर स्वरूपाची कारवाई करावी, असे देखील सुचवले. यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी आरोपीला खुले सोडले जाणार नसल्याचे आश्वासन दिले.
सीसीटीव्ही बंद
दरम्यान प्राथमिक तपासामध्ये या भागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले असल्याचे निदर्शनास आले. मात्र सीसीटीव्ही कॅमेरेच बंद असल्याची बाब निदर्शनास आली आहे. गेल्याच वर्षी पोलीस प्रशासनाच्या वतीने शासनाकडे पाठपुरावा करून कॅमेरे लावण्यात आले आहे. मात्र आता विटंबना झाल्यानंतर हे कॅमेरे बंद असल्याची बाब निदर्शनास आली आहे.