Wednesday, April 23, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ वाहतुकीसाठी वेळेतच खुले होणार : मुख्यमंत्री

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ वाहतुकीसाठी वेळेतच खुले होणार : मुख्यमंत्री

आज उपमुख्यमंत्र्यांसोबत विमानतळाची हेलिकॉप्टरद्वारे केली पाहणी

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ राज्याच्या नव्हे तर देशाच्या दृष्टीने महत्वाचे विमानतळ ठरणार आहे. नियोजित वेळेत विमानतळ सुरु व्हावे यासाठी आजची पाहणी आहे. सुरु असणाऱ्या कामातील अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आज उलवे येथे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळाची हेलिकॅप्टरद्वारे पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार श्रीरंग बरणे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार महेश बालदी, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, एमएआरडीएचे संचालक डॉ. संजय मुखर्जी, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, सिडकोचे सहसंचालक कैलास शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख आदी उपस्थित होते.

नवी मुंबई विमानतळ हे पुणे, मुंबई, गोवा यांच्यासाठी महत्वाचे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते विमानतळाचे भूमीपूजन झाले होते आणि उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होईल. विमानतळ उभारणीत चांगले आणि वेगाने काम सुरु आहे यांचा आनंद आहे. हा प्रकल्प लवकरच लोकांसाठी खुला होईल यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत असेही शिंदे यांनी सांगितले.

नवी मुंबई विमानतळाचे काम अतिशय वेगाने सुरु असून हे विमानतळ देशातील अद्वितीय असे विमानतळ असेल अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०२४ पर्यंत हे विमानतळ सुरु करण्याचा प्रयत्न असेल यादृष्टीने विमानतळाच्या कामात येणाऱ्या अडचणी सोडवून कामाला गती द्यावी हा आजच्या पाहणीचा उद्देश असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. विविध दळणवळणाची साधने या विमानतळाला जोडण्यात येणार असल्याने हे विमानतळ देशातील अद्वितीय असे विमानतळ म्हणून गणले जाईल. मुंबईला विमानतळाच्या माध्यमातून एक चांगली भेट देणार असल्याचे ही फडणवीस म्हणाले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील २२ किलोमीटरचा सिलिंक महत्वाचा दुवा ठरेल. दरवर्षी ९ कोटी प्रवासी वाहतूक होईल. म्हणूनच मोठ्या शहारासाठी हा प्रकल्प लोकांना दिलासा देणारा आहे. याची क्षमता वाढविण्यासाठी परवानगीची कामे युद्धपातळीवर सुरु आहेत. पहिल्या टप्प्यात चार टर्मिनल असून ४२ विमाने उभी राहतील. ५ हजार ५०० क्षमतेचे कार पार्किंग असेल. हे विमानतळ ११.४ किलोमीटर परिसरात उभे राहत असून दोन धावपट्या असतील. विमानतळाच्या उभारणीबाबत अडचणी तत्काळ दूर कराव्यात आणि २०२४ मध्ये प्रवासी वाहतूक सुरु करावी अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -