नागपूर : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गद्दार संबोधल्याने शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार आणि खासदार चांगलेच भडकले आहेत. ‘गद्दार कोण आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राने पहाटेच्या शपथविधीच्या वेळी बघितले, असे टीकास्त्र रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी सोडले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी पदाधिकाऱ्यांचे शिबिर नागपुरात पार पडले. त्यावेळी अजित पवार यांनी आगामी निवडणुकीत मतदान करताना ‘पन्नास खोके, एकदम ओके‘ विसरू नका असे सांगताना गद्दारांना धडा शिकवा, असे आवाहन केले होते.
यावर बोलताना तुमाने यांनी थेट अजित पवार यांच्यावर वार केला. ते म्हणाले, अजित पवार यांनी आम्हाला खोक्याची भाषा सांगू नये. ते जलसंपदा मंत्री असताना किती गैरव्यवहार झाले आणि कोणी ट्रक भरून नेले हे सर्वांनाच माहिती आहे.
त्यांच्याच कार्यकाळात झालेल्या सिंचन गैरव्यवहारामुळे डझनभर अधिकाऱ्यां विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. आम्ही गद्दार असू तर हा शब्द त्यांनाच आधी लागू होतो. महाविकास आघाडी सत्ता स्थापनेच्या तयारीत असताना पहाटे शपथविधी उरकून घेणाऱ्याला काय म्हणायचे, असेही तुमाने म्हणाले.