मच्छीमारांसाठी समुद्रात जाणे धोकादायक
रत्नागिरी : अरबी समुद्रात तयार होत असलेले ‘बिपरजॉय’ चक्री वादळ पश्चिम किनारपट्टीपासून खोल समुद्रात सुमारे एक हजार किलोमीटर दूर असल्याचे हवामान खात्याच्या सूत्रांकडून आणि अभ्यासकांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे या चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवर फारसा परिणाम जाणवणार नाही. तसेच त्यामुळे येणाऱ्या पावसाचीही शक्यता नाही. त्यामुळे चक्री वादळाबाबत घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही.
पश्चिम दिशेने येणारे हे संभाव्य चक्रीवादळ ईशान्येला पाकिस्तानात धडकू शकेल अशी माहिती हवामान अभासकांनी दिली आहे. मात्र या काळात मच्छीमारांनी समुद्रात जाणे धोकादायक ठरू शकते. फयान चक्री वादळामुळे रत्नागिरीतील मच्छीमारांना याची निश्चित जाणीव आहे. मात्र या चक्रीवादळामुळे नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन लांबणीवर जाणार असून त्यामुळे समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
हे चक्रीवादळ सध्या गोव्याच्या पश्चिम नैऋत्य किनाऱ्यापासून ९२० किमी अंतरावर आहे. तर, मुंबईच्या दक्षिण-नैऋत्यपासून ११२० किमी अंतरावर आहे. पोरबंदरच्या दक्षिण भागापासून ११६० किमी, तर पाकिस्तानातील दक्षिण कराचीपासून १५२० किमी अंतरावर आहे. त्यामुळे हे चक्रीवादळ सागरी क्षेत्रातच असून त्याची कोकण किंवा महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टी भागाला झळ बसण्याची कोणतीही शक्यता नसल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र या चक्री वादळामुळे मान्सून साठी निर्माण झालेली अनुकूलता खंडित होणार असून मान्सून लांबणीवर जाण्याची भीती आहे. आधीच पाण्याची टंचाई स्थिती गंभीर असताना मान्सूनचे आगमन उशिराने झाल्यास पाणी टंचाईचे स्वरूप अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.