फोनवर झालेले संभाषणाचे रेकॉर्ड तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना कसे मिळाले?
रेल्वे अधिकाऱ्यांचे फोन टॅप, अपघातामागे ‘टीएमसी’चे षडयंत्र?
भाजप नेत्याच्या आरोपांनी खळबळ!
पश्चिम बंगाल : ओडिशातील बालासोर येथे तीन रेल्वेंचा भीषण अपघात झाला. या घटनेनंतर राजकारण तापले आहे. विरोधक केंद्र सरकारच्या कारभारावर टीका करत आहेत तर दुसरीकडे पश्चिम बंगालमधील दिग्गज नेते भाजप आमदार सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. ओडिशा रेल्वे अपघातामागे तृणमूल काँग्रेसचे षडयंत्र आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
त्याआधी तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी शनिवारी सोशल मीडियावर रेल्वे अधिकाऱ्यांच्या फोन संभाषणाचा रेकॉर्ड केलेला कॉल शेअर केला होता. त्यांनी असेही म्हटले होते की, याबाबत यातील सत्यता पडताळली जाऊ शकत नाही.
सुवेंदू अधिकारी म्हणाले की, ‘दोन रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेस बहनागा रेल्वे स्टेशनजवळ रुळावरून घसरल्याबाबत फोनवर झालेले संभाषणाचे रेकॉर्ड तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना कसे मिळाले, याचा तपास सीबीआयने करायला हवा. या नेत्यांनी हे संभाषण सोशल मीडियावरही व्हायरल केले. हे कसे शक्य आहे, असा सवाल अधिकारी यांनी केला. मला वाटत नाही की हा कॉल रेल्वेने लीक केला असेल. मला दाट संशय आहे की कोलकाता पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांनी हा फोन रेकॉर्ड केला असावा.’
अधिकारी पुढे म्हणाले, ‘आम्ही काही दिवस वाट पाहू. नंतर या कॉल लीक प्रकरणालाही सीबीआयने समाविष्ट करून घ्यावे, यासाठी प्रयत्न करू. या प्रकरणी जर सकारात्मक निर्णय घेतला गेला नाही तर मी स्वतः भुवनेश्वरला जाईल. याचिकेसहीत सीबीआय कार्यालयात जाईल. यावरही जर काहीच झाले नाही तर न्यायालयातही दाद मागणार आहोत.’
अधिकारी म्हणाले, ‘तृणमूलला भीती कशाची वाटत आहे?, त्याचे कारण काय?, जर दुर्घटना पश्चिम बंगालमध्ये घडलीच नसेल तर घाबरण्याचे कारण काय?, असा सवाल करत ही घटना म्हणजे टीएमसीचे कारस्थान आहे. या लोकांनी पोलिसांच्या मदतीने रेल्वे अधिकाऱ्यांचे फोन टॅप केले. या लोकांना रेल्वे अधिकाऱ्यांच्या संभाषणाची माहिती कशी मिळाली?, संभाषण लीक कसे झाले?, सीबीआय तपासात या गोष्टी आल्या पाहिजेत. नाहीतर आम्ही थेट न्यायालयात जाऊ.’