मुंबई : जन्मदात्या आईचा खून करून २२ वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना विक्रोळीत घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कन्नमवार नगर येथील गुलमोहर सोसायटीमध्ये ही दुर्दैवी घटना घडली.
उमा तावडे (५४) यांना त्यांचा मुलगा अभिषेक तावडेने जीवे मारले. अभिषेक बेरोजगार असल्याची माहिती आहे. तसेच, त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याने या दोघांमध्ये नेहमी वाद होत असत. त्यातूनच हे कृत्य करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्याचे वडील लोअर परळ येथे खाजगी कंपनीत कार्यरत असून आई एका दवाखान्यात काम करत असे. आई आणि मुलामध्ये रोज भांडणं होत असत. त्यामुळे या भांडणाला कंटाळून वडील कार्यालयातच थांबायचे. ते आठवड्यातून फक्त रविवारी घरी जात होते. नेहमीप्रमाणे वडील रविवारी घरी आले आणि त्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र, दरवाजा कुणीही उघडला नाही.
त्यानंतर वडिलांनी शेजारच्यांच्या मदतीने पोलीस आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य पाहता अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाजा तोडला. तेव्हा घरात उमा या बेडरुमध्ये मृतावस्थेत आढळल्या तर अभिषेक बाहेरच्या खोलीत गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.