आगामी काळात मुंबई व नवी दिल्लीत होणार धम्मपरिषद
बँकॉक : वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुध्दिस्ट या अत्यंत महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय बौध्द संघटनेच्या ऑननरी उपाध्यक्षपदी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची निवड करण्यात आली आहे. आज बँकॉक येथे वर्ल्ड फेलोशिपचे अध्यक्ष फॅलाप थेरी यांनी रामदास आठवले यांची भेट घेतली व याबाबतची माहिती दिली.
यावेळी झालेल्या चर्चेत फॅलाप थेरी यांनी येत्या फेब्रुवारी २०२४ मध्ये वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुध्दिस्टची परिषद मुंबईत व २०२७ मध्ये आंतरराष्ट्रीय मुख्य धम्म परिषद नवी दिल्लीत आयोजित करण्याचा प्रस्ताव रामदास आठवले यांना दिला. हे दोन्ही प्रस्ताव रामदास आठवले यांनी स्विकारले असून आगामी काळात या दोन्ही परिषदा नियोजित ठिकाणी घेण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी वर्ल्ड फेलोशिप ऑफ युथ बुध्दिस्टचे अध्यक्ष आयडेंट थेरी, मूळचे नागपूरचे असणारे मात्र गेल्या २० वर्षापासुन थायलँड बँकॉकमध्ये राहणारे उद्योजक राज वासनिक तसेच युनायटेड बुध्दीस्ट फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश कांबळे, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे, काजल शेवाळे, विशाल शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुध्दिस्ट या जागतिक बौध्द संघटनेला बौध्द जगतामध्ये फार महत्व आहे. रामदास आठवले यापूर्वी वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुध्दिस्टचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष राहिले असून त्यांनी या संस्थेच्या अनेक संमेलन, धम्मपरिषद व बैठकींना उपस्थिती नोंदविली आहे. आता आठवलेंची या संस्थेच्या आंतरराष्ट्रीय ऑननरी उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या संस्थेचे ५५ देशामध्ये कामकाज चालू आहे. या निवडीबद्दल रामदास आठवलेंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तसेच भारतीय बौद्ध आणि आंबेडकरी जनतेत आनंदाची भावना आहे.