ब्रीजवरुन लोखंडी सळई कोसळून थेट कारच्या छतामधून आर पार घुसली
ठाणे : तीन हात नाका येथे मेट्रोच्या ब्रीजचे काम सुरू असताना काल एक लोखंडी सळई धावत्या मोटारकारवर कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही परंतु या धक्कादायक प्रकारामुळे वाहनचालक भयभीत झाले आहेत.
ब्रीजवर काम करणाऱ्या एका कामगाराच्या हातातून लोखंडी सळई सुटली. ही सळई मुलुंड चेकनाक्याकडून तीन हात नाक्याकडे येणाऱ्या एका मोटारकारवर कोसळली. त्या एमएच ०३ डीजी २३४१ या इको गाडीमधून चालक जितेंद्र यादव यांच्यासह तिघेजण भांडूप ते कोलशेत असा प्रवास करीत होते. सुदैवाने, भर दुपारी झालेल्या या अपघातामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. वाहतूक पोलिसांच्या मदतीने ही मोटारकार रस्त्याच्या बाजूला करण्यात आली.
मेट्रोच्या ब्रीजखालून वाहनांची सतत वर्दळ चालू असते. या घटनेमुळे मेट्रो काम सुरू असताना घेण्यात येणारी सुरक्षा सक्षम आहे का? जर मोठी दुर्घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल ठाणेकर उपस्थित करत आहेत.