मुंबई : परदेशातील उद्योगांद्वारे भारतात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या शेवटच्या तिमाहीत महाराष्ट्र हे राज्य इतर सर्व राज्यांच्या पुढे गेले आहे. परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्राने गुजरात आणि कर्नाटकला मागे टाकले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. फडणवीस यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, पुन्हा एकदा एफडीआयमध्ये महाराष्ट्र नंबर १! देशातल्या परकीय गुंतवणुकीत २९ टक्क्यांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, होय, पुन्हा एकदा एफडीआयमध्ये महाराष्ट्र नंबर १! आम्ही सातत्याने सांगत होतो की खंडणी, वसुली, भ्रष्टाचाराचा महाविकास आघाडीचा काळ संपवून राज्यात नवे सरकार आले आहे आणि आता महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओघ वाढणार आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा नंबर 1 होणार… डीआयपीपीने जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीचा जो अहवाल जारी केला आहे, त्यात पुन्हा एकदा महाराष्ट्र सर्वाधिक एफडीआय (परकीय गुंतवणूक) प्राप्त करणारे राज्य ठरले आहे. २९ टक्क्यांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून, कर्नाटक २४ टक्क्यांसह दुसर्या तर गुजरात १७ टक्क्यांसह तिसर्या क्रमांकावर आहे.
Maharashtra is Number 1 Again, in FDI !
We were continuously telling that since now the corrupt, blackmailer, extortionist MVA Govt is uprooted and our Govt is back, the flow of investment in Maharashtra will increase and we will be Number 1 Again.
And here we go – the DIPP Jan… pic.twitter.com/IeywipLwHK— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 5, 2023
“महाराष्ट्र उद्योगात पहिल्या नंबरवर होता आणि पुन्हा आम्ही महाराष्ट्राला पहिल्या नंबरवर आणू”, असं फडणवीस काही महिन्यांपूर्वी एका भाषणात म्हणाले होते. या भषणाचा काही भाग, तसेच वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत परकीय गुंतवणुकीबद्दल त्यांनी केलेले दावे ट्विटरवर शेअर केले आहेत. त्यात फडणवीसांनी म्हटलं होतं की, महाराष्ट्र गुजरातच्या मागे गेला असेल तर दोन वर्षात महाराष्ट्र गुजरातच्या पुढे नेऊ. ही हेल्दी कॉम्पिटिशन (निरोगी स्पर्धा) आहे. गुजरात हा आपला लहान भाऊ आहे. तो काय पाकिस्तान नाही. आम्हाला गुजरात, कर्नाटकसह सर्व राज्यांच्या पुढे जायचं आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्र परकीय चलनाच्या बाबतीत पहिल्या नंबरवर येईल.